कणकवली : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर कासार्डे येथे खासगी आराम बस मालवाहू ट्रकला मागून जोरदार धडकली. याअपघातात आराम बसचा चालक जागीच ठार झाला आहे. तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ट्रक चालकही जखमी झाला असून गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
आराम बस गोवा तर ट्रक वेंगुर्लेच्या दिशेने जात होता. सोमवारी पहाटे ५:३० च्या सुमारास ही घटना घडली . महामार्गावर असलेल्या दाट धुक्यामुळे हा अपघात घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.पुण्याहून गोव्याकडे भरधाव वेगाने निघालेली खाजगी आराम बस मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात होती. ही आराम बस कासार्डे जांभूळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ आली असता, पुढे चाललेल्या ट्रकला मागाहून धडकली.
महामार्गावर पडलेल्या दाट धुक्यामुळे मालवाहू ट्रक चालक दिलीप काशीराम आंबर्डेकर ट्रक हळू चालवत होते. खासगी आराम बस चालक मंदार तटकरे ( रा.शिवाजीनगर, चिपळूण) यांना दाट धुक्यामुळे समोरील ट्रकचा अंदाज आला नाही. त्यांना वाहनावर नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे आराम बस ट्रकला मागून जोरात धडकली.या अपघातामध्ये आराम बसचा चालक जागीच ठार झाला. तर क्लीनर संजय डोंगळे हे गंभीर जखमी झाले. ही धडक जोरदार झाल्याने ट्रक चालक आंबुर्डेकर यानाही मार बसला. दोन्ही जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. या अपघातात बसमधील प्रवाशांना फारशी दुखापत झालेली नाही.स्थानीक नागरिकांनी मदत करत जखमी तसेच प्रवाशांना गाडी बाहेर सुखरूप काढले. घटनास्थळी पोहचलेल्या कणकवली पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, सहाययक पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले, कासार्डे आऊट पोस्ट्सचे नितीन खाडे यांनी पंचनामा केला.
अनेक वर्षानतंर प्रथमच या भागात मोठय़ा प्रमाणात धुके पडले असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आराम बसचा चालक मंदार तटकरे हा चिपळूण येथील असून सध्या तो पनवेल येथे पत्नी व मुलीसह रहात होता. त्याच्यावर चिपळूण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.