ऑनलाइन लोकमत
राजापूर, दि. १२ - मुंबईकडे जाणाऱ्या नीता ट्रॅव्हल्सच्या बसने दुचाकीला उडवल्याची घटना सोमवारी रात्री ८.२0च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर येथे पॉवर हाऊसनजीक घडली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जखमी झाले असून, त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.
गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यापासून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक अधिक असतानाही खासगी आरामबसेस अतिशय वेगाने जात असल्यानेच अपघात घडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.
सोमवारी दुपारी गोव्याहून निघालेली नीता ट्रॅव्हल्सची बस सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास राजापुरात आली. महामार्गावरील पेट्रोल पंपापासून काही अंतरावर या बसने ओणीकडून राजापूरला जाणाऱ्या एका दुचाकीला उडवले. संकेत पावसकर (३0, राजापूर) आणि काशीनाथ कुडकर (२५, राजापूर) हे दोघेजण त्या दुचाकीवर होते. बसच्या धडकेमुळे दोघांच्याही डोक्याला दुखापत झाली आहे. त्यातील संकेतची प्रकृती गंभीर आहे.
अपघात झाल्यानंतर बसचे दोन चालक घटनास्थळावरून पळून गेले. तिसरा चालक गाडीमध्ये झोपला होता. अपघातानंतर बस थोड्या मागे असलेल्या एका हॉटेलनजीक उभी करून ठेवण्यात आली आहे. दोन्ही जखमींना तत्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले.