राजापूर : रायपाटण गावातील गावठी दारुधंदे स्थानिक ग्रामस्थांनी तंटामुक्त समितीच्या सहाय्याने बंद पाडले असले तरी शेजारील गावातून अवैध मार्गाने देशी व गावठी दारुची आयात करुन त्याची खुलेआम विक्री सुरु आहे. याबाबत रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार सुरु आहे. याचा निषेध म्हणून २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्याचा निर्णय रायपाटण गावच्या तंटामुक्त समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह पोलीस अधीक्षकांनाही दण्यात आले आहे.मागील चार ते पाच वर्षात रायपाटण ग्रामस्थांनी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावात उठाव केला व गावात सुरु असलेले गावठी दारुधंदे बंद पाडले. गावात एकही दारुचा धंदा असू नये याच उद्देशाने दारुबंदीची मोहीम राबविण्यात आली.अलिकडे चोरट्या मार्गाने गावात देशी दारुसह गावठी दारुची आयात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. गावातील संसार टिकावेत, यासाठी तंटामुक्त समितीने दारूबंदी केली. मात्र बाहेरील गावातून दारू आणली जात असल्याने तंटामुक्त समितीने नाराजी व्यक्त केली आहे.ही आयात राजरोसपणे चालत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याला रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा छुपा पाठींबा आहे. त्यामुळेच अवैध दारु विक्री करणाऱ्यांना कोणाचीही भीती राहिलेली नाही, असा आरोप तंटामुक्त समितीच्यावतीने करण्यात आला आहे.याबाबत रायपाटण गावच्या तंटामुक्त समितीने प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)समिती आक्रमक : उपोषणाचा मार्गगावात दारूबंदी करणाऱ्या तंटामुक्त समितीचे दारूबंदी करण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने आता समिती आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उपोषण करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
दारुमुक्त रायपाटणला ‘आयात’ची धुंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 12:10 AM