राजापूर : येथील जवाहर चौकात असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा कार्यक़्रम नगर परिषद प्रशासनाने हाती घेतला आहे. त्यासाठी ८ लाख ९८ हजार ३०२ रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.राजापूर शहरातील गजबजलेल्या जवाहर चौक परिसरात १९६५ साली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. तत्कालीन आमदार स. मु. ठाकरे यांच्या हस्ते त्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर मागील अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस यांचा यशस्वी सामना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याने केला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याशी राजापूरकरांच्या अनेक आठवणी आहेत. त्यामुळे या पुतळ्याची रंगरंगोटी करावी, अशी मागणी राजापूरवासीयांमधून करण्यात येत होती. राजापूरकरांची ही मागणी लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण लवकरच हा पुतळा नव्या रुपात येणार आहे.मागील अनेक वर्षे पावसाळी दिवसात शहरातील दोन्ही नद्यांना येणाऱ्या महापुराचा विळखा शिवपुतळ्याला बसत होता. अनेकदा पुतळ्याच्या गळ्यापर्यंत पुराच्या पाण्याचा वेढा असायचा. शिवाय पुतळ्यावर कोणत्याच प्रकारची मेघडंबरी नसल्याने त्याला सावली नव्हती.मागील अनेक निवडणुकांतील विजयी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते, अनेक संसद सदस्यांसह विधानसभा सदस्य, धार्मिक संघटनांचे नेते या ठिकाणी येऊन पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गेले. मात्र, पुतळा परिसराच्या नूतनीकरणाचा मुद्दा मात्र शासकीय कागदपत्रांवरुन पुढे सरकायला तयार नव्हता. मात्र, नगर परिषदेच्या कौन्सिलच्या बैठकात चर्चा झडत असायच्या.अखेर शिवपुतळ्याच्या नूतनीकरणाबातचा आराखडा तयार करण्यात आला असून, सुमारे ८ लाख ९८ हजार ३१२ एवढा अपेक्षित खर्च होणार आहे. पुतळ्याच्या आजूबाजूला कायमस्वरुपी सावलीची व्यवस्था केली जाणार आहे. शिवाय पुतळ्याचे कायमस्वरुपी संरक्षण व्हावे, यासाठी संबंधित परिसर बंदिस्त केला जाणार आहे. अद्ययावत असे त्याचे रुपडे बनवले जाणार आहे.राजापूर नगरपालिका प्रशासनाने ४ फेब्रुवारीला ई टेंडरची प्रक्रिया अवलंबली आहे. त्यानुसार हे टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराकडून जवाहर चौकातील शिवपुतळ्याचे नूतनीकरण पार पडणार आहे. (प्रतिनिधी)
राजापुरात छत्रपतींच्या पुतळ्याचे नूतनीकरण
By admin | Published: February 11, 2015 10:48 PM