सावंतवाडी : चार वर्षांपूर्वी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोलगाव फाटा ते कुणकेरी रस्त्यावर दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा ९० लाख रुपये खर्च घातले जात आहेत. बांधकाम विभागाला कोण वाली नसल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने कोट्यवधी रुपये दुरुस्तीच्या नावाखाली खर्ची घालण्याचे काम सध्या सुरू आहे. या दुरुस्तीच्या कामाला कुणकेरी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे.
रस्त्यावर ग्रामस्थांना फक्त खडी दिसत होती. डांबर दिसतच नव्हते. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी याबाबतचे निवेदन बांधकामच्या अधिकाऱ्यांना दिले खरे, पण ठेकेदार व अधिकारी यांच्यात संगनमत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची, हा प्रश्नच आहे.कोलगाव फाटा ते कुणकेरी आरोग्य केंद्र हा रस्ता २०१३-१४ मध्ये म्हणजेच चार वर्षांपूर्वी जिल्हा विकास आराखड्यातून करण्यात आला होता. त्यावेळी या रस्त्यावर बांधकाम विभागाने १ कोटी १२ लाख ७० हजार रुपये खर्ची घातले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षांतच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. त्यामुळे ग्रामस्थांना या खड्ड्यांची डोकेदुखी होऊ लागल्याने रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी अनेकवेळा करण्यात आली होती.
त्यामुळे नवीन आराखड्यात हा रस्ता बसवून त्याची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, सरकारची अवस्था डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखी झाल्याने बांधकाममध्ये अधिकारी करतील तीच पूर्व दिशा असे असून त्याचा प्रत्यय या रस्त्याच्या कामात आला आहे.चार वर्षांपूर्वी जो रस्ता बांधकाम विभागाने १ कोटी १२ लाखात केला. त्याच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी चक्क ९० लाख रुपये खर्च करण्यात येत असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. म्हणजे नाकापेक्षा मोती जड अशीच काहीशी अवस्था बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाली आहे. मूळ किमतीच्या रस्त्याच्या तुलनेत दुरुस्तीचा खर्च अधिकचा वाटू लागला आहे.
बांधकाम विभागाने त्यावर आणखी काही पैसे खर्च केले असते तर रस्ता पुन्हा करून झाला असता. पण बांधकाम अधिकाऱ्यांना दुरुस्तीच्या कामातच स्वारस्य असले तर मग कोण सामान्य माणसाच्या पैशाचा विचार करणार? याकडे ना राजकीय नेत्यांचे लक्ष ना सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, अशी काहीशी अवस्था दिसून येत आहे.
या रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा एक-दोन वर्षांत सव्वा कोटीचे दीड कोटी करून अधिकारी पुन्हा रस्ता करण्याचा घाट घालणारच आहेत. पण ही दुरुस्ती तरी योग्यप्रकारे व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. रस्त्यावर फक्त खडीच दिसून येत होती. त्यावर डांबर ग्रामस्थांना दिसले नसल्याने अखेर ग्रामस्थांनी दर्जाहीन काम असल्याने ते बंद पाडलेच.या रस्त्यावर ज्या प्रमाणात डांबर पाहिजे तसे घातले गेले नाही तसेच रस्ता टिकावा म्हणून जो प्रयत्न करायला पाहिजे तो केला जात नाही, असा आरोप करीत ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. जर योग्य काम झाले नाही तर काम होऊ देणार नाही असा इशारा नितीन सावंत, अमीर नाईक, कृष्णकांत सावंत, आनंद गावडे, नामदेव नाईक, प्रमोद परब, रविकिरण तेंडोलकर, राजन गावडे, अभि सावंत यानी दिला आहे.