कणकवली : कणकवली शहरात उद्यापासून होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर आज लोकांनी जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती. यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला.कणकवली शहरासह तालुक्यात कोरोनाचा फैलाव खुप मोठ्या प्रमाणात होत असून त्याच पार्श्वभूमीवर कणकवली शहरात १ मे ते १० मे या दहा दिवसांसाठी जनता कर्फ्यूची घोषणा प्रशासनामार्फत करण्यात आली. कणकवली शहरासोबतच कणकवली तालुक्यातही जनता कर्फ्यू लागू करावा, या तालुका प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा देत हरकूळ बुद्रुक, नांदगाव या गावांतही जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंच्या आणि अन्नधान्याच्या खरेदीसाठी आज कणकवली शहरात आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी तोबा गर्दी केली होती. त्यात सोशल डिस्टंसिंगचा अक्षरशः फज्जा उडाला आहे. या जनता कर्फ्यूच्या काळात लोकांनी नियमांचे पालन करून स्वतःसोबत दुसऱ्यांचाही जीव वाचवणे खुप गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य दक्षता घेऊन पाऊल उचलणे आवश्यक आहे.