राजापूर : तालुक्यातील इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून शासनाने जाहीर केलेल्या राजापूर शहरासह उर्वरित ४७ गावांतील अहवाल स्थानिक समित्यांकडून तालुका समितीकडे प्राप्त झाला आहे. लवकरच तो वन विभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे. त्या अहवालात काही गावे इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्याची मागणी केली आहे.शासनाच्या कस्तुरीरंगन समितीने दिलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण २९२ गावांचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राजापूर तालुक्यात संपूर्ण राजापूर शहरासह ४७ गावांचा समावेश आहे. त्यासंदर्भातील अंतिम अहवाल शासनाला सादर करण्यापूर्वी ग्रामीण भागात सरपंच, तर शहरी भागात नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. त्यामध्ये वनविभाग, तलाठी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. त्या समित्यांनी ग्रामस्थ व शहरी भागातील नागरिक यांची सुनावणी घ्यावी व इको सेन्सेटिव्हबाबतचा अहवाल तालुका समितीकडे पाठवावा, असे निर्देश यापूर्वी शासनाने दिलेले होते. त्यानुसार तालुक्यात समाविष्ट झालेल्या ४७ गावांसह राजापूर शहरातील जनसुनावणी पार पडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सूचना मांडण्यात आल्या होत्या. काही गावांनी तर आपल्या गावाला शंभर टक्के या क्षेत्रातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. भविष्यात येणाऱ्या अडीअडचणी नजरेपुढे ठेवून राजापूर शहरालाही या क्षेत्रातून वगळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत जनसुनावणी झाल्यानंतर तयार केलेला अहवाल स्थानिक पातळीवरील समित्यांनी तहसीलदारांच्या नेतृत्त्वाखाली गठीत केलेल्या तालुका समितीकडे पाठवला आहे. तहसीलदार के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका समितीची बैठक नुकतीच पार पडली होती. त्यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, जिल्हा वनक्षेत्रपाल अशोक लाड, इको सेन्सेटिव्ह गावांशी संबंधित गावांचे तलाठी कृषी अधिकारी उपस्थित होते. स्थानिक पातळीवरून आलेल्या समित्यांच्या अहवालावर चर्चा झाल्यानंतर तो वनविभागामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार आहे. ज्या गावांनी या क्षेत्रातून आपल्याला पूर्ण वगळण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीचा शासन कशा प्रकारे विचार करते, याला महत्व आले आहे. (प्रतिनिधी)५इको सेन्सेटिव्ह झोनमधील गावेराजापूर शहरासह तालुक्यातील झर्ये, वाटूळ, येरडव, कोंड दसूर, परुळे, चिखले, कोंडसर खुर्द, पांगरी खुर्द, तिवरे, धामणपे, हरळ, वरची गुरववाडी, कोतापूर, कोळवणखडी, सौंदळ, खिणगिणी, केळवडे, पाथर्डे, पाचल आगरेवाडी, भराडे, करक, हर्डी, गोठणे दोनिवडे, ओशिवळे, वाळवड, काजिर्डा, फुफेरे, कोळंब, ताम्हाने पहिलीवाडी, जांभवली, मिळंद, बाग, हसोळ तर्फ सौंदळ, पांगरी बुद्रुक, सावडाव, हातदे, डोंगर, मोसम, माळुंगे, पन्हळेतर्फ सौंदळ, शेजवली, वाल्ये, बांदिवडे, प्रिंदावन, कुंभवडे, पाल्ये यांचा समावेश आहे.
अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना होणार सादर
By admin | Published: April 15, 2015 11:13 PM