त्सुनामी किंवा भूकंप येण्यापूर्वी भूगर्भातून काही संदेश मिळतात का? भूगर्भातील ऊर्जा शोधता येईल का? तिचा उपयोग करता येईल का? अशा विविध विषयांवर संशोधन करणारे रत्नागिरीतील फिनोलेक्स अॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अॅण्ड टेक्नॉलॉजीचे विज्ञान व मानवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी यांची २१व्या शतकातील सर्वोत्कृष्ट बुध्दिमान २००० मान्यवरांच्या यादीत निवड झाली आहे. इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटर, केंब्रीज, इंग्लंड या संस्थेने त्यांची ही निवड केली आहे. डिसेंबर महिन्यात त्यांचा हा शोधनिबंध प्रसिद्ध होणार आहे.उपयोजित गणित या विषयाचे गेली १८ वर्षे फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये अध्यापन करणारे व प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. संजय कुलकर्णी यांनी गुलबर्गा विद्यापीठातून एम. एससी. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथून ‘नॉन न्युट्रिआॅन फ्लुईड फ्लो आॅफ सेकंड आॅर्डर टाईप’ या विषयांतर्गत पीएचडी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर लॅम्बर्ट अॅकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी यांनी त्यांचे ‘इलेस्टो-व्हिसकस फ्लुईड फ्लो’ विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. त्यांचे विज्ञान विषयातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीयस्तरावर शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. इतकेच नव्हे तर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधन कमिटीवर ते कार्यरत आहेत. विज्ञानातील संशोधनाबद्दल डॉ. कुलकर्णी यांची दखल घेऊन त्यांची २००० बुध्दिवंतामध्ये निवड करण्यात आली आहे. इंग्लंड-केंब्रीज येथील इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटरतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध प्रसिध्द केला जाणार आहे.प्रश्न : ‘इलेस्टो - व्हिसकस फ्लुईड फ्लो’ या विषयाचा तुम्ही शोधनिबंध मांडला आहे. नेमके तुम्ही काय संशोधन केले आहे?उत्तर :जमिनीची पातळी, भूगर्भाची विशिष्ट रचना आहे. परंतु जेव्हा त्सुनामी किंवा भूकंप होतो, त्यावेळी जमिनीतून विशिष्ट कंपने तयार होतात. मात्र, भूकंप किंवा त्सुनामी येण्यापूर्वी कंपने कशी येतात, त्यामध्ये वाढ होते का? त्सुनामीपूर्वी संदेश मिळू शकतील का? याबाबतचे संशोधन केले आहे. तेच या शोधनिबंधात मांडले आहे.े प्रश्न : तुमच्या संशोधनाचा फायदा आणखी कशासाठी होणार आहे ?उत्तर :सच्छिद्र खडकातून वाहणाऱ्या तेलाचा प्रवाह शोधण्यासाठी, पृथ्वीच्या आंतरभागाकडून बाह्य आवरणाकडे येणारी भूगर्भीय ऊर्जा शोधण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी, फुफ्फूसामधील विविध द्रवांच्या प्रवाहामध्ये होणारे जैवयंत्र अभियांत्रिकीचे उपयोजन, रासायनिक यंत्र अभियांत्रिकी यरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये या संशोधनाचा फायदा होणार आहे. प्रश्न : आजपर्यंत आपले किती शोधनिबंध प्रसिध्द झाले. उत्तर :राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर आतापर्यंत विविध विषयांवरील २५ शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. जरनल पोरस मीडिया (युएसए), इंटरनॅशनल जरनल यरोस्पेस अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग (युएसए), इंडियन जरनल आॅफ इंजिनिरिंग अँड मटेरियल सायन्स, डिफेन्स अँड जरनलमध्ये शोधनिबंध प्रसिध्द झाले आहेत. त्याचप्रमाणे लॅम्बर्ट अकॅडमिक पब्लिशिंग, जर्मनी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘इलेस्टो-व्हिसकस फ्लुईड फ्लो’ पुस्तकदेखील प्रसिध्द केले आहे.प्रश्न : राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमचे लेखन प्रसिध्द झाले आहे. तुम्ही अन्य कोणत्या कमिटीवर काम केले आहे का ?उत्तर :जरनल आॅफ पोरस मीडिया, नॅशनल अॅड इंटरनॅशनल जरनल बोर्ड, वर्ल्ड अकादमी आॅफ सायन्स, इंजिनिअरिंग अॅड टेक्नोलॉजी या कमिटीवर कार्यरत आहे. या कमिटीव्दारे मार्गदर्शन किंवा संशोधन साहित्य तपासणी करण्यात येते. इतकेच नव्हे; तर आवश्यक त्यावेळेला विविध सेमिनारमध्ये मार्गदर्शन करत आहे. प्रश्न : शोधनिंबधाची निवड कशी केली जाते.उत्तर :इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटरकडून गुणवत्तेवर शोधनिबंधांची निवड केली जाते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्याकडून यावर्षी प्रसिध्द होणारे नववे जर्नल असून, त्यामध्ये शोधनिबंधाचा समावेश होणार आहे. केवळ संशोधन विचारात न घेता त्याचा अन्य विविध क्षेत्रात होणारे उपयोग विचारात घेतले जातात.प्रश्न : गेली १८ वर्षे अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षा आहेत ?उत्तर :विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत करावे. अभ्यासिक पुस्तकांबरोबर अन्य वाचन करणे आवश्यक आहे. अन्य संदर्भ पुस्तकांचा वापर करून अभ्यास करावा. मी स्वत: इथेच राहून पीएच. डी. पूर्ण केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्ट, चिकाटी व जिद्दीने अभ्यासक्रम पूर्ण करावा. यश आपोआप मिळते. प्रश्न : अठरा वर्षांच्या अध्यापनात लक्षात राहिलेले विद्यार्थी?उत्तर :गेल्या अठरा वर्षात अनेक विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याची संधी मिळाली. परंतु चिकाटी, जिद्दीने यश संपादन करणारे विद्यार्थी मात्र कायम लक्षात राहतात. प्रथमेश कारखानीस (मेकॅनिकल इंजिनिअरिंग), प्रवीण राहुल (इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग), सुनीत पटवर्धन (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) यांनी मिळविलेल्या यशाबद्दल ते कायमस्वरूपी स्मरणात आहेत. विद्यार्थ्यांचे यश ही आमच्या अध्यापनाची पोच असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. - मेहरुन नाकाडे
भूगर्भातील संदेशांवर संशोधन
By admin | Published: October 12, 2015 9:24 PM