रत्नागिरी : शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता, ग्राहकांना विनाखंड वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी शहरात रहाटाघर उपकेंद्र उभारण्यात आले आहे. हे उपकेंद्र रनपार, हार्बर व कुवारबाव उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्यास या उपकेंद्रावरून तातडीने पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल.रत्नागिरी शहरात चाळीस हजार वीज ग्राहक आहेत. तसेच झाडगाव, हार्बर, नाचणेरोड व एमआयडीसी मिळून चार उपकेंद्र आहेत. हार्बर उपकेंद्र ज्यावेळी बंद पडते, त्यावेळी निम्मे शहर अंधारात लोटते. भविष्यात ग्राहकांना अंधारात न ठेवण्यासाठी उपकेंद्र नव्याने उभारण्यात आलेल्या रहाटाघर उपकेंद्राशी जोडण्यात येणार आहे.हार्बर, झाडगाव उपकेंद्राला महापारेषणच्या कुवारबाव उपकेंद्रातील ११० केव्ही वाहिनीवरून वीजपुरवठा होतो. या वाहिनीवर बिघाड उद्भवल्यास चारही उपकेंद्र ठप्प होण्याचा धोका निर्माण होतो. त्यावेळी पर्यायी मार्गाने वीजपुरवठा व्हावा, यासाठी कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार आहे, तर रहाटाघर उपकेंद्राला ११० के. व्ही. रनपार वाहिनीवरून वीजपुरवठा घेण्यात येणार आहे. तसेच रहाटाघर व हार्बर उपकेंद्र जोडले जाणार आहेत. शिवाय एमआयडीसी व नाचणे उपकेंद्र निवळीला जोडणार आहेत. जेणेकरून तातडीच्या वेळी पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकेल. रहाटाघर उपकेंद्र सुसज्ज झाले असून, काही चाचण्या सुरू आहेत. लवकरच हे उपकेंद्र ग्राहकांसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे. रहाटाघरसाठी स्वयंचलित वीजबिल केंद्र मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील ग्राहकांना रहाटाघर येथे वीजबिल भरणे सुलभ होणार आहे.महावितरण कंपनीकडून पायाभूत आराखडा दोनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ६८ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून जिल्ह्यासाठी नवीन सहा उपकेंद्र मंजूर झाली आहेत. पायाभूत आराखडा एकमध्ये एकूण ८ उपकेंद्र मंजूर होती. पैकी पाच उपकेंद्र पूर्ण होऊन कार्यान्वित झाली आहेत, तर उर्वरित तीन उपकेंद्रांचे काम सुरू आहे. चिपळूण तालुक्यातील शिरगाव, धामणंद व गुहागर येथील उपकेंद्राचे काम सुरू आहे, तर कुवारबाव, साखरपा, चांदोर, हर्णै, भूम येथील उपकेंद्र कार्यान्वित झाली आहेत. आराखडा दोनमध्ये कोतवडे, पानवल, लोटे एमआयडीसी (खेड), कोळवली (शिवणे), वालोपे (चिपळूण), पालघर (मंडणगड) येथे उपकेंद्र मंजूर झाली असून, केवळ वालोपे उपकेंद्र जागेअभावी संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे उभारण्यात येणार आहे.रहाटाघर वीज उपकेंद्रामुळे आता महावितरण कंपनीच्या कामकाजात आणखी सुसूत्रता येणार आहे. (प्रतिनिधी)फिडरवरील ताण होणार कमीसोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडतो. याशिवाय डोंगरदऱ्यातून वाहिन्या गेल्यामुळे पावसाळ्यात वाहिन्या तुटणे, रोहित्र बिघाड किंवा जळणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. उपकेंद्रावर लगतची अनेक गावे विसंबून असल्यामुळे याचा फटका संबंधित गावांना बसतो. त्यामुळे महावितरणने फिडरवरील ताण कमी होण्यासाठी नवीन उपकेंद्रांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महावितरणची वीज वितरण व्यवस्था आणखीन सुधारणार आहे. गेले अनेक महिने महावितरणला पर्यायी वीजपुरवठ्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे ग्राहकांना अंधारात राहावे लागत होते.चार उपकेंद्ररत्नागिरी शहरात चाळीस हजार ग्राहक, तर झाडगाव, हार्बर, नाचणे रोड व एमआयडीसी अशी चार उपकेंद्र.हार्बर उपकेंद्र बंद पडल्यास आता रहाटाघरचा पर्याय.कुवारबाव महापारेषण उपकेंद्र निवळी केंद्राला जोडण्यात येणार.
अखंडित विजेसाठी ‘रहाटाघर’चा पर्याय
By admin | Published: February 03, 2015 10:47 PM