सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांसाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या रेश्मा रविकांत सावंत यांची अध्यक्षपदी, तर रणजित दत्तात्रय देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हात उंचावून घेण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत सावंत यांना २८, तर प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या वर्षा पवार यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई यांना २८, तर भाजपच्या सुधीर नकाशे यांना २२ मते मिळाली. राज्यात जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना अनेक ठिकाणी शिवसेनेने भाजपला दूर ठेवत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे उदाहरण समोर असतानाच सिंधुदुर्गात मात्र सेना व भाजप युती कायम राहिल्याचे दिसून आले. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी यांनी काँग्रेसला मतदान केले. या खास सभेसाठी ५० सदस्यांनी सभागृहात उपस्थिती दर्शविली होती.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी दुपारी तीन वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात खास सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर उपस्थित होते. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडीसाठी सकाळी शिवसेना व भाजप युतीने नामनिर्देशनपत्र दाखल करीत खाते उघडले. यावेळी अध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या वर्षा उदय पवार व उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या सुधीर गणपत नकाशे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी आमदार वैभव नाईक, अभय शिरसाट, पंचायत समिती सदस्य सदाशिव ओगले, गटनेते नागेंद्र परब, सेना, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेसने अध्यक्षपदासाठी रेश्मा सावंत व उपाध्यक्षपदासाठी रणजित देसाई यांचे नामनिर्देशनपत्र पीठासन अधिकारी रवींद्र सावळकर यांच्याकडे सादर केले. यावेळी आमदार नीतेश राणे, गटनेते सतीश सावंत, जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत, संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत दुपारी ३.३० पर्यंत होती. मात्र, यावेळी कोणीही अर्ज मागे न घेतल्याने पीठासन अधिकारी रवींद्र सावळकर यांनी ३.३० नंतर हात उंचावून मतदान करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार मतदान कौल नोंदवून घेत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार अध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसच्या रेश्मा सावंत यांना २८ मते, तर शिवसेनेच्या वर्षा पवार यांना २२ मते मिळाली. उपाध्यक्षपदाचे उमेदवार काँग्रेसचे रणजित देसाई यांना २८, तर भाजपचे सुधीर नकाशे यांना २२ मते मिळाली. त्यानुसार पीठासन अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करताना अध्यक्षपदी रेश्मा सावंत व उपाध्यक्षपदी रणजित देसाई यांची निवड झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत व उपाध्यक्ष रणजित देसाई यांचे सेना व भाजपच्या अमरसेन सावंत, नागेंद्र परब, वर्षा पवार, संजय पडते, राजेंद्र म्हापसेकर यांच्यासह सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)
अध्यक्षपदी रेश्मा सावंत
By admin | Published: March 21, 2017 11:08 PM