कणकवली : शहरातील रस्त्यांच्या कामाची कमी दराची निविदा मंजूर झाल्यानंतर ते काम नाकारणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर बाबी पडताळून कारवाई करावी. तसेच वेळ पडल्यास संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी. असा महत्त्वपूर्ण निर्णय बुधवारी झालेल्या नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.नगरपंचायतीची सभा प.पू. भालचंद्र्र महाराज सभागृहात नगराध्यक्षा माधुरी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, मुख्याधिकारी अवधूत तावडे उपस्थित होते. दरवेळी आरोप प्रत्यारोपांमुळे गाजणारी नगरपंचायतीची सभा यावेळी मात्र शांततेत झाली. या सभेत शहरातील विविध विकास कामांच्या निविदाना मंजुरी देण्यात आली. यावेळी शहरातील काही रस्त्याची कामे कोल्डमिक्सद्वारे करण्याच्या निविदेविषयीचा मुद्दा चर्चेत आला. या कामासाठी अनिस नाईक यांनी कमी दराची निविदा दाखल केली होती. ही निविदा कमी दरामुळे नगरपंचायत प्रशासनाने मंजूर केली होती. मात्र, अनिस नाईक यांनी ही कामे करण्यास असमर्थता दर्शवित तसे पत्रही नगरपंचायत प्रशासनाला सादर केल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. या मुद्यावर जोरदार चर्चा झाली. निविदा मंजूर झाल्यानंतर काम करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे चुकीचा पायंडा पडू नये. यासाठी नाईक यांची अनामत रक्कम जप्त करण्यात यावी अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. तर माजी उपनगराध्यक्ष समीर नलावडे व अभिजीत मुसळे यांनी संबधित ठेकेदाराला अनामत रक्कम जप्त करण्याबाबत माहिती देण्यात यावी असे यावेळी सुचविले. तर उपनगराध्यक्षांसह अन्य नगरसेवकांनी कायदेशीर बाबींची पाहणी करून त्यानंतर अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय प्रशासनाने घ्यावा असे सांगितले. शेवटी या मुद्यावर सर्वांचे एकमत झाले. पटकीदेवी जवळील मच्छीमार्केटच्या ठिकाणी मटण मार्केट होणार का? असा प्रश्न अभीजित मुसळे यांनी चर्चेदरम्यान उपस्थित केला. तसेच माजी नगराध्यक्षानी त्याबाबत घोषणा केली होती असेही सांगितले. मात्र, सध्या तरी त्याठिकाणी मटण मार्केट होऊ शकत नसल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. माजी नगराध्यक्षांना घोषणा करताना याबाबत माहिती नव्हती का? असा प्रति प्रश्न मुसळे यांनी यावेळी नगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्याना केला. त्यामुळे काही वेळ या मुद्यावरून जोरदार चर्चा झाली. चर्मकार बांधवाना समाजमंदिरासाठी जागा देताना ती कायद्याच्या चौकटीत बसवून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच आंबडपाल मध्यम प्रकल्प विभाग तसेच शिवडाव धरणाची ८ लाख रुपये थकित पाणी पट्टी १३ व्या वित्त आयोग निधिमधून भरण्याचा निर्णयही घेण्यात आला. नगरपंचायत कर विभागाकडील मिळकतींचे हस्तांतरण अथवा फेरफार करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याचे ठरविण्यात आले. वारसाने फेरफार करायचा झाल्यास ५00 रूपये तर खरेदीखताने करायचा असल्यास आता १000 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अनधिकृत नळ जोडणी नियमित करण्यासाठी संबंधित नागरिकांना नोटिसा बजावण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच सात दिवसाच्या आत त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास कारवाई करून दंड आकारण्याचे ठरविण्यात आले. ही जोडणी नियमित करताना ८00 रुपये शुल्क आकारण्याबरोबरच ५00 रुपये दंडही करण्याचे निश्चित करण्यात आले.नगरपंचायतीच्या बाजारकरात वाढ करून पाच रूपयांऐवजी तो १0 रुपये करण्याबरोबरच विक्रेते तसेच व्यापारी यांच्या व्यवसायावरुन कर आकारण्याचे ठरविण्यात आले. शहरातील मुख्य चौकात ट्राफिक सिग्नल यंत्रणा बसविणे, मराठा मंडळ स्मशानभूमीसाठी लोखंडी स्टँड, स्टील ट्रेचर व स्टील गाडी खरेदी करणे, टोल फ्री क्रमांक, नगराध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदी, आरक्षण भू संपादन, मोबाईल टॉयलेट व्हॅन खरेदी, नळ योजना पंप खरेदी अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. माजी नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत, नगरसेविका माया सांब्रेकर या सभेला अनुपस्थित होत्या. (वार्ताहर)बंडू हर्णे यांचा आरोप : ‘त्या’ कामाच्या विलंबाला माजी नगराध्यक्ष जबाबदारशहरातील रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत यासाठी ती एकाच एजन्सीला द्यावीत. तसेच त्याकामांची जबाबदारी संबंधित एजन्सीवर निश्चित करावीत. अशी तत्कालीन नगराध्यक्षा अॅड. प्रज्ञा खोत यांची सूचना होती. त्यामुळेच रस्त्यांची कामे रखडली आहेत. त्या कामांच्या विलंबाला त्याच जबाबदार आहेत. मात्र, ही कामे करण्यासाठी आता ठेकेदार तयार होत नाहीत. तर पूर्वीच्याच काही ठेकेदारानी आपली कंपनी बनवून कामासाठी निविदा भरल्या असल्याकडे नगरसेवक बंडू हर्णे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच दीड वर्षाहून अधिक काळ ही रस्त्याची कामे रखडली आहेत. कणकवलीवासियांना इतका वेळ प्रतीक्षा करावी लागली आहे. आता विलंब न करता तातडीने ही कामे करण्यात यावीत असेही त्यांनी सुचविले. मात्र, माजी नगराध्यक्षा सभेला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा काय कामाची असा प्रश्न समीर नलावडे व अभी मुसळे यांनी उपस्थित केला.कचऱ्याचे होणार व्यवस्थापनओला व सुका कचरा संकलनासाठी प्रत्येक कुटुंबाला दोन बकेट्स तसेच दोन कापडी पिशव्या पुरविण्यात येतील. त्याचबरोबर २0१४ पूर्वीच्या निवासी संकुलामध्ये ओला व सुका कचरा संकलित करण्यासाठी दोन बकेट्स तसेच त्याला तारेचे बंदिस्त कुंपण नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी हा निर्णय या सभेत घेण्यात आला.
ठेकेदारावर कारवाईचा ठराव
By admin | Published: January 14, 2016 9:59 PM