चिपळूण : दि. १० जून हा जागतिक नेत्रदान दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. सह्याद्री निसर्गमित्र या संस्थेतर्फे या दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह येथे सायंकाळी ७ वाजता नेत्रदान करणाऱ्यांच्या ७ नातेवाईकांचा खास गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त १ हजार नेत्रदान नोंदणीचा संकल्पही केला जाणार आहे. नेत्रदान करणाऱ्याची इच्छा जरी नोंद केली असेल तरी मृत्यूनंतर जवळच्या नातेवाईकांनी ती पूर्ण केली तरच यशस्वी नेत्रदान होऊ शकते. याचा विचार करता मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकांनी दु:खाच्या काळात सामाजिक भान ठेवून खंबीरपणे केलेले नेत्रदान ही अंधांसाठी एक महान उपलब्धी असते. याचा विचार करुन हा खास गौरव सोहळा होणार आहे. या गौरवामुळे अधिकाधिक नेत्रदाते पुढे येतील व जगातला अंध:कार दूर होण्यासाठी प्रयत्न करतील, यासाठी हा कार्यक्रम घेतला जात आहे. यावेळी नेत्रदान आय बँकेतर्फे देण्यात आलेले नेत्रदान प्रमाणपत्र सन्मानपूर्वक दिले जाणार आहे. याच दिवशी चिपळूणमध्ये नेत्रदान पत्रके व मृत्यूपश्चात नेत्रदानाचे फॉर्म उपलब्ध करण्यात येणार असून, १ हजार नेत्रदान नोंदणी करण्यात येणार आहे. सह्याद्री निसर्गतर्फे नेत्रदानाची सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. याचे उद्घाटनही यानिमित्ताने होणार आहे. या संकेतस्थळामध्ये नेत्रदानाची गरज, नेत्रदान कसे होते, नेत्रदानासाठी आपण काय करु शकतो आदी माहिती उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्लोबल गिव्हींग या अमेरिकेतील संस्थेच्या सहकार्याने चिपळुणातील नेत्रदानासाठी निधी उभा करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाला नॅब आय हॉस्पिटलचे अध्यक्ष सुचय रेडीज, डॉ. ग. ल. जोशी, डॉ. निशांत राठी, डॉ. विनय चक्करवार, डॉ. वाघमारे, डॉ. मुकादम आदी उपस्थित राहणार आहेत. सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे व दृष्टीदान आय बँक, सांगली चिपळूणमधील नेत्रतज्ज्ञ यांच्या सहकार्याने नेत्रदान मोहीम चालू करण्यात आली आहे. या मोहिमेलाही प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत ७ नेत्रदानातून १४ व्यक्तींना दृष्टी प्राप्त झाली आहे.भारतात सध्या १ लाख ४० हजार व्यक्ती कॉनिया उपलब्ध नसल्याने अंध आहेत. प्रतिवर्षी १ लाख कॉनिया जमवणे गरजेचे आहे. नेत्रदान करणाऱ्या नातेवाईकांच्या गौरव सोहळ्यानिमित्त नेत्रदानाचे अर्ज भरुन या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सह्याद्री निसर्ग मित्रतर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)
चिपळुणात १ हजार नेत्रदान नोंदणीचा संकल्प
By admin | Published: June 08, 2015 12:05 AM