सावंतवाडी : कोलगाव येथील दूरसंचारचा बंद असलेला मनोरा पुन्हा एकदा सुरू करावा, अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक ज्ञानेश्वर महापुरुष यांची भेट घेऊन केली.कोलगाव येथे दूरसंचारकडून बसविण्यात आलेला मोबाईल मनोरा वारंवार बंद पडत असल्यामुळे वादात सापडला आहे. दरम्यान या कारणावरून शिवसेना व भाजपात कलगीतुरा रंगला आहे. यात शिवसेनेच्या मायकल डिसोझा यांनी आपण यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. मनोरा वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन हा मनोरा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली होती.गुरुवारी पुन्हा एकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रबंधक ज्ञानेश्वर महापुरुष यांची भेट घेऊन पुन्हा हा मनोरा सुरू करण्याची मागणी केली. आम्ही नेटवर्क चालू करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र जनरेटर उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.
आम्ही तात्पुरती पर्याय व्यवस्था करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी दूरसंचारचे महापुरुष यांनी दिले. तसेच तात्पुरता मनोरा सुरू केला आहे. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल. परंतु तांत्रिक बाब म्हणून सहकार्य अपेक्षित आहे, असे आवाहन महापुरुष यांनी केले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा परिषद मायकल डिसोझा, पंचायत समिती सदस्य मेघशाम काजरेकर, संदीप घोगळे, पप्पू ठीकार आदी उपस्थित होते.