ओरोस : शासनाकडून आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्य प्रकारे न राबविल्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीच्या लाभापासून वंचित ठेवले. आर्थिक नुकसान करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनीजिल्हा परिषद कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले.सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या कामकाजाचा कसा फटका बसला आणि आर्थिक नुकसान कसे झाले याबाबत शासनाचे व जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, भानू तळगावकर, सोनू नाईक, कैवल्य पवार, आनंद पेडणेकर यांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले तर त्यांना पाठिंबा देण्याकरिता राजन कोरगावकर, नंदकुमार राणे, प्रसाद वारंग, संभाजी तौर यांनी सहभाग घेतला.सेवानिवृत्तीनंतर पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाची नोंद करून व त्यांचे प्रशिक्षणच झाले नाही अशा शिक्षकांच्या प्रशिक्षण झाल्याबाबतच्या खोट्या तारखा नोंदवून टिपणी करणारे व त्या टिपणीवर शिफारस करून स्वाक्षरी करणारे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना निवडश्रेणी मंजुरीच्या आदेशानंतर त्यात झालेल्या गंभीर चुका लेखी निदर्शनात आणून दिल्या होत्या.सेवानिवृत्तांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधलेया आंदोलनातून सेवानिवृत्त शिक्षकांनी लक्ष वेधताना शासनाकडून आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्यप्रकारे न राबविल्यामुळे निवडश्रेणीच्या लाभापासून शिक्षकांना वंचित रहावे लागले आहे असे म्हटले आहे.
सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांची निवडश्रेणीबाबतची अट पूर्ण करून घेणारे संबंधित अधिकारी, सेवानिवृत्तीनंतर प्रशिक्षणासाठी आपल्या आस्थापनेकडून बेकायदेशीररित्या कार्यमुक्त करणारे व सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्या आस्थापनेकडे हजर करून घेणारे अधिकारी आदींबाबतही लक्ष वेधण्यात आले.