सावंतवाडी : परतीच्या पावसाने घातलेल्या धुमशानामुळे मडुऱ्यासह पंचक्रोशीला जबरदस्त फटका बसला आहे. उभी पिके आडवी झाली आहेत. पाडलोस, न्हावेलीत ठिकठिकाणी शेतीची पावसामुळे दैना झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
पेरणीसाठी उसनवारी करून घेतलेल्या बी-बियाण्यांचे पैसेही या परतीच्या पावसामुळे निघणे मुश्किल झाले आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी शहर बाजारपेठा फुलल्या असताना ग्रामीण भागात मात्र, शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोर जावे लागत आहे.मडुरा, पाडलोस, रोणापाल, शेर्ले, कास, निगुडे, न्हावेली भागात भातपीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. भातशेती हे अनेकांचे उत्पन्नाचे साधन असल्याने बळीराजा दरवर्षी भातपीक घेतो.
यावर्षी भातशेती चांगली झाली होती. मात्र, पंधरा दिवसांपासून कडकडाटासह परतीच्या पावसाने मडुरा पंचक्रोशीत थैमान घातल्याने भातशेतीचे नुकसान झाले असून पिके आडवी झाली आहेत. त्यामुळे भाताच्या लोंब्यांना मोड येण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे शेतकरी तथा पाडलोस ग्रामपंचायत सदस्य गणपत पराडकर यांनी सांगितले.पेरणीसाठी लागणारी बी-बियाणे विकत घेण्यासाठी तसेच शेतीसाठी शेतकऱ्यांनी सहकारी सोसायट्या, जिल्हा बँकांमधून कर्ज काढले आहे. मात्र, आता भातशेतीच उद्ध्वस्त झाल्याने कर्जाचे पैसे फेडायचे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. असे असले तरी सरकारी अधिकारी पंचनामे करण्यासाठी चालढकल किंवा दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.शाळेला दिवाळीची सुटी पडल्यामुळे मुले नरकासूर बनविण्यात मग्न आहेत. परंतु आठवडाभर पडत असलेल्या पावसाने यंदा नरकासूर बनविण्यात मुलांचा उत्साह दिसून आला नाही. परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडाला असून भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने कर्ज फेडण्याचे सोडाच, परंतु वर्षभर खायचे काय, असा सवाल शेतकरी करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ ठिकठिकाणी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा युवासेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक यांनी दिला आहे.क्यार वादळामुळे नागरिकांत भीतीअरबी समुद्र्रात निर्माण झालेल्या क्यार वादळामुळे गेले दोन दिवस सर्वत्र सोसाट्याचा वारा वाहत आहे. त्यामुळे मडुरा पंचक्रोशीत काही ठिकाणी पडझड झाली आहे. न्हावेली-रेवटेवाडी येथे वीज वाहिनीवर झाड पडून वीजपुरवठा बंद झाला होता. पाडलोसमध्येही झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वारा व पाऊस मोठा असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गेले चार दिवस पडत असलेल्या वादळी पावसामुळे मडुरा परिसरातील भातपीक आडवे झाले आहे.