सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाचे गोपाळकाल्याच्या मुहूर्तावर पुनरागमन झाले आहे. गुरूवारी सायंकाळपासूनच सह्याद्री पट्यात पाऊस दाखल झाला. त्यामुळे गुरूवारी सायंकाळी वैभववाडी, कणकवली तालुक्यातील काही भागात दमदार पाऊस झाला. तर गुरूवारी रात्रभर पावसाची रिपरिप सुरू होती. दरम्यान गणेशोत्सव १० दिवसांवर येऊन ठेपल्याने पावसाचे सावट उत्सवावर असण्याची दाट शक्यता आहे.मागील पंधरा दिवस पावसाने पूर्णपणे उघडीप दिली होती. कडक ऊन पडत होते. परिणामी भरडावरील, कातळावरील भातशेती पाण्याअभावी धोक्यात आली होती. पाणी नसल्याने भात रोपे करपून पिवळी पडली होती. दरम्यान आता पाऊस दाखल झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.गणेशोत्सवावर पावसाचे सावटकोकणातील घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६५ हजार घरगुती गणपतींचे पूजन केले जाते. त्यामुळे लाखो चाकरमानी पुढील चार दिवसांत घरोघरी येणार आहेत. परंतु यावर्षीच्या गणेशोत्सवावर पावसाचे सावट असण्याची शक्यता आहे. पावसाने मागील पंधरा दिवसांपासून दिलेली ओढ तो सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात भरून काढण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात पावसाचे पुनरागमन, गणेशोत्सवावर पावसाचे सावट
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 08, 2023 4:08 PM