सावंतवाडी : सध्या लोकशाहीची मुल्ये पायाखाली तुडवली जात आहेत. सामान्य माणसाला योग्य दिशा दाखवणाऱ्यांचे जीवन संपवले जात आहे. तर अशा अनेक साहित्यिकांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. या निंदनीय घटनांबाबत साहित्यिक ांमार्फत राज्य शासनाचे पुरस्कार परत देण्यासाठीच्या लढ्यात आता सिंधुदुर्गातही सुरूवात झाली आहे. येथील प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोंविद काजरेकर यांनी तसे पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे. या पत्रात साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना, भारतीय लोकशाहीने दिलेल्या आचार-विचारांच्या स्वातंत्र्याचा निषेध अत्यंत हिंसक आणि निंंदनीय स्वरूपात होताना दिसत आहे. घटनेच्या चौकटीत राहून विचार मांडणाऱ्या विचारवंत, कार्यकर्ते, लेखक यांच्या हत्या होणे, त्यांना धमक्या मिळणे हे प्रकारही वाढीस लागले आहेत. या विरोधात शासन पुरेसे गंभीर असल्याचे वा या घटनांशी संबंधित संशयित व्यक्ती व संस्था यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात ठोस पावले उचलत असल्याचे निदर्शनास येत नाही. एक लेखक म्हणून अशा परिस्थितीत शासनाने लेखन गौरवासाठी दिलेले पुरस्कार आम्ही सिंधुदुर्गातील लेखक, कवी अत्यंक उद्विग्न मन:स्थितीत परत करू इच्छितो. लेखक वा लेखनाचा गौरव व्हावा असे वातावरण आजूबाजूला दिसत नसल्याने व त्याला शासनाची अनास्था जबाबदार असल्याचे जाणवल्याने प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही ही कृती करत असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण संवेदनशीलतेने आमची भूमिका समजून घेऊन राज्याचे प्रमुख या नात्याने महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित जिविताची व त्याच्या मूलभूत स्वातंत्र्याची हमी द्यावी, अशी कळकळीच विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. निवेदनावर साहित्यिक प्रवीण दशरथ बांदेकर, वीरधवल नारायण परब, गोंविद गंगाराम काजरेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्य शासनाने दिलेले गौरवास्पद पुरस्कार परत करण्याची चळवळ राज्यभर सुरू असताना सिंधुदुर्गातूनही या चळवळीला मिळालेले बळ उपरोक्त अत्याचाराला बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना व त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणादायी असल्याच्या प्रतिक्रीया व्यक्त करण्यात येत आहेत. (वार्ताहर)
सिंधुदुर्गातूनही पुरस्कार परत देणार
By admin | Published: October 19, 2015 10:43 PM