रत्नागिरी : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना व अडचणींसह भरती, बढती, आरक्षण यासह विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत समितीचे प्रमुख डॉ. सुरेश खाडे यांच्यासह सदस्य लखन मलिक, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये यांच्यासह जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, भारतीय प्रशासन सेवेतील परिविक्षाधिन अधिकारी विजय राठोड, अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयातील अनुसूचित जातीतील पदांच्या अनुशेषाची भरती आणि बढत्यांबाबत माहिती घेतली. तसेच अॅट्रॉसिटीकायद्यांतर्गत दाखल तक्रारींबाबत झालेली कार्यवाही, विद्यार्थी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा या विषयांसह विविध विषयांचा आढावा घेतला. यावेळी समितीप्रमुख खाडे यांनी अनुसूचित जाती कर्मचाऱ्यांच्या भरती तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीबाबत संबंधित विभागप्रमुखांना आवश्यक सूचना दिल्या.तत्पूर्वी समितीकडून सकाळच्या सत्रात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांबाबत जाणून घेतले. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. दुपारच्या सत्रात समितीप्रमुखांसह इतर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या अनुसूचित जातीच्या अधिकारी, कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष आणि त्यांच्याकरिता राबवण्यात येणाऱ्या इतर कल्याणकारी योजनांबाबत लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी यांच्यासमवेत चर्चा केली. यावेळी समितीसोबत आलेले मागासवर्गीय कक्षाच्या उपजिल्हाधिकारी कल्पना जगताप, राहुल लिंगरवार, प्रवीण लावंड, अधिकराव पाटील, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल तक्रारींबाबत कार्यवाहीची घेतली माहिती.शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा आदी विषयांवरही बैठकीत चर्चा.
अनुसूचित जाती कल्याण समितीकडून योजनांचा आढावा
By admin | Published: February 11, 2016 10:34 PM