सिंधुदुर्गनगरी दि. 03 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विर्डी लघु पाटबंधारे योजनेस (ता. दोडामार्ग) 145 कोटी 99लाख 60 हजार रुपयांची प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1345हेक्टर एवढी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम विर्डी गावाच्या खालच्या बाजूस सुमारे तीन किलोमीटरवर असणाऱ्या गोवा राज्याच्या सीमेलगत हलतर नाल्यावर करण्यात येत आहे. हलतर नाला कर्नाटक राज्यात उगम पावून महाराष्ट्राच्या विर्डी गावातून गोवा राज्यात जातो आणि पुढे मांडवी नदीस मिळतो.
महादयी खोऱ्यातील महाराष्ट्राचा हा एकमेव बांधकामाधीन प्रकल्प असून राज्याच्या हिश्याच्या पाणी वापरासाठी 2003-04च्या दरसूचीवर आधारित 43 कोटी 68 लाख रुपयांच्या किंमतीस सप्टेंबर 2005 मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
मात्र, भूसंपादन खर्च, संकल्पचित्रातील बदल आणि दरसूची यामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानुसार2013-14 च्या दरसूचीवर आधारित आज सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.