सिंधुदुर्गनगरी : सुधारित व संकरित भात वाणाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी स्पर्धात्मक चुरस निर्माण व्हावी या उद्देशाने खरीप हंगाम २0१५-१६ मध्ये भात पीक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने भात पीक स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी दिली. त्यानुसार सन २0१५-१६ च्या खरीप हंगामामध्ये तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर अशा तीन स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका पातळीसाठी २0 रुपये, जिल्हा पातळीसाठी ४0 रुपये व राज्य पातळीसाठी ६0 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका पातळीवर भाग घेण्यासाठी भातपिकाचा किमान १0 गुंठे उल्लेख असलेला सातबारा उतारा व विहीत नमुन्यामधील अर्जासह संबंधित तालुका पंचायत समितीकडे १४ आॅगस्ट २0१५ पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. तालुका पातळीवरील विजेते स्पर्धक जिल्हा स्तरावर व जिल्हा पातळीवरील विजेते स्पर्धक राज्य पातळीवर भाग घेऊ शकतात. त्यानुसार तालुका पातळीवर दोन शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अधिकाधिक उत्पन्न घेण्याच्या उद्देशाने स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गशी संपर्क साधावा. (प्रतिनिधी) जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांकास ३ हजार, तर द्वितीय क्रमांकास २ हजार व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकास १ हजार, तर द्वितीय क्रमांकास रुपये ५00 या स्वरूपात बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे यांनी दिली.
खरीप हंगामासाठी भात पीक स्पर्धा
By admin | Published: August 09, 2015 8:59 PM