प्रथमेश गुरव -- वेंगुर्ले वेंगुर्ले नगरपरिषदेने हागणदारीमुक्त व स्वच्छतेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आणि तो टिकविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्यासाठी सध्या कडक मोहीम राबविली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी शनिवारी केलेल्या ‘उघड्यावरील’ कारवाईने मात्र या मोहीमेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्याधिकारी यांचा हेतू शहरातील नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी महत्वाचा असून आदर्शास पात्र आहे. पण त्यासाठी त्यांनी वापरलेल्या पद्धतीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या प्रकरणात राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्याने आदर्श शहराच्या निर्मितीसाठी यामुळे अडचणी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेचे मख्याधिकारी रामदास कोकरे यांनी मुख्याधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नागरिक, व्यापारी यांना विश्वासात घेत स्वछता अभियान, हागणदारीमुक्त शहर, स्वच्छ सुंदर शहर, प्लास्टिक मुक्ती अशी अभियाने राबवली. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसादही दिला. त्यामुळेच वेंगुर्ले नगर परिषद स्वच्छता अभियानात राज्यात प्रथम आली. पुढे देशातही प्रथम येण्यासाठी सज्ज असताना कॅम्प परिसरातील परप्रांतीयाकडून उघड्यावर शौचास बसण्याचा प्रकार घडला आहे. यामुळे शहर हागणदारीमुक्त करण्याकडे परप्रांतीय गांभीर्याने याची दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. मुख्याधिकारी कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डनिहाय स्वच्छता दूत नेमून तसेच पालिका प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी फिरून शहरात किती शौचालये आहेत, याचा सर्व्हे केला आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशांना शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून १२ हजार रू पये अनुदान तसेच नगरपालिकेकडून त्वरीत शौचालय बांधण्यास परवानगी देण्यात आली. यामुळे सर्वांच्या सहकार्याने शहर हागणदारीमुक्त झाले. साहजिकच शहराला वैभव प्राप्त होत आहे. शहराची स्वच्छता, संकलीत कचऱ्याचे वर्गीकरण, हागणदारीमुक्ती यातून आदर्श शहराची निर्मिती करण्याची कवाडे खुली करण्यासाठी कोकरे यांचे विशेष प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. दरम्यान, हा दर्जा कायम राखण्यासाठी व त्याची सवय नागरिकांना कायमस्वरूपी लागण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कृती आराखडाही आखला आहे. प्रशासनामार्फत दर गुरूवारी करण्यात येणारी स्वच्छता हा त्यांचा उपक्रम राज्याच्या प्रशासनाला आदर्शवत असा आहे. शिवाय शहराच्या अविरत स्वच्छतेसाठी त्यांनी प्रत्येक प्रभागाचा दररोज आढावा घेण्याचे कामही सुरू ठेवले आहे. याअंतर्गत शहर हागणदारीमुक्तीच्या उपक्रमाच्या देखरेखीसाठी भरारी पथक नेमून त्याला कार्यरत ठेवले आहे. याच पथकाने शनिवारी केलेल्या गस्तीवेळी उघड्यावर शौचास बसलेल्या नागरिकांवर कारवाई करत त्याची वाजतगाजत मिरवणूक काढली. या प्रकरणाची दखल घेत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धिंडप्रकरणी सखोल चौकशी व्हावी, असे निवेदन पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिले. तर भाजपाने कोकरे यांचे समर्थन केले. आणखीही राजकीय पक्ष आपआपली भुमिका घेतील आणि पाहीजे त्या अर्थाने या प्रकरणाचा किस पाडतील. पण विषय उरतो तो त्या व्यक्तीच्या कृत्याचा आणि मुख्याधिकाऱ्यांच्या हेतूचा.मुख्याधिकारी स्वच्छ शहर निर्माण करू पाहत आहेत ते नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि आदर्शासाठीच आहे. शिवाय त्यांचे सर्वंकष प्रयत्न त्यांच्या अंगात भिनलेले स्वच्छ व आदर्श वेंगुर्ले शहराचे प्रेम दर्शवते. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनाही स्वच्छतेच्या मोहीमेत सहभागी करवून घेणे ही तर त्या प्रेमाची परिणीतीच म्हणावी लागेल. पण जसे प्रेम माणसाला आंधळ करत तसेच कोकरे यांनी उघड्यावरील शौचास गेलेल्या व्यक्तीवर केलेली कारवाईही आंधळेपणानेच झाली आहे. वास्तविक पाहता संपूर्ण शहरात वारंवार स्वत: फिरून याबाबत जागृती केली आहे. त्यामुळे नागरीकांनीही तसे सहकार्य करणे त्यांनी अपेक्षीत धरले. पण त्याची उपेक्षा झाल्याने व वेगळे काहीतरी ठोस करण्यासाठी त्यांनी कारवाईचे हे पाऊल उचलले असावे. पण परिणामांचे भान त्यांनी न राखल्याने त्यांचे हे पाऊल चिखलात रूतले. कारवाई करणे गरजेचे होते, पण या कारवाईलाही मर्यादा हवी होती. त्याची मिरवणूक काढणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय या कारवाईची छायाचित्रे व त्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर टाकणे यामुळे या कारवाईला वेगळे वळण मिळाले आहे. कोकरे यांचा हेतू नक्कीच चांगला आहे, शिवाय तो आदर्शवतही आहे, पण त्यांच्याकडून करण्यात आलेली कृती मात्र नागरीकांना आवडलेली नाही. तसेच ती प्रशासनालाही अस्विकाराहार्य अशीच आहे. शहराची वाटचाल : राजकीय कीसया प्रकरणाची शहरासह जिल्हयात जोरदार चर्चा होत आहे. काँग्रेसने याला आक्षेप घेत मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर भाजपाने मुख्याधिकाऱ्यांना भेटून त्यांचे समर्थन केले आहे. उद्या याप्रकरणात आपआपल्या पद्धतीने भूमिका जाहीर होतील. राजकीय पक्षांच्या हाती हे आयते कोलीत मिळाले आहे. या सर्वांमुळे प्रत्येकाचे मनोरंजनही होईल, पण शहराच्या वाटचालीचे काय? भविष्यातील निरोगी शहराची निर्मिती व आरोग्य संपन्न जीवन कोकणातील आकर्षणाचा केेंद्रबिंदूही ठरू शकतो. म्हणूनच या प्रकरणाचा कीस न पाडता शहराच्या उज्वलतेसाठी सर्वांचे सहकार्यच उपयुक्त आहे. आरोग्य संपन्न पिढीसाठी कटीबद्ध : कोकरेवेंगुर्ले शहराचा स्वच्छतेबाबत आदर्श रहावे यासाठी आपण ही कारवाई केली आहे. ती योग्य असून वारंवार याबाबत तशा सूचना करण्यात आल्या आहेत. नागरीकांचेही याला उत्तम सहकार्य कायम मिळत आल्यानेच राज्यात शहराने प्रथम क्रमांक मिळविला. याचा दर्जा कायम राखणे गरजेचे आहेच पण भविष्यात या शहरातून निर्माण होणारे निरोगी जीवन व आरोग्य संपन्न पिढी कोकणातील वेगळा व देशातील आदर्शवत पॅटर्न ठरणार आहे. त्यामुळे आपण याबाबतीत कटीबद्ध आहोत. यासाठी कोणाचाही दबाव आला तरी चालेल. लोकांच्या हितासाठीच आपण हा निर्णय घेतला आहे.- रामदास कोकरे,मुख्याधिकारी, वेंगुर्ले नगरपरिषदमानहानी करणारी कारवाई : किसमतअली खान आपण केवळ शौचास जात होतो, तोवरच आपल्यावर कारवाई करण्यात आली. आपण या कारवाईसाठी दंडात्मक रक्कम पाचशे रूपये भरण्यासाठीही तयार होतो. पण आपले काहीही न ऐकता आपल्यावर बदनामीजनक अशी कारवाई करण्यात आली. यामुळे आपली मानहानी झाली असून मुख्याधिकारी यांनी चुकीची पद्धत अवलंबली आहे. आपल्याला झालेला दंड आपण भरण्यास तयार असताना अशाप्रकारे सुडाने कारवाई केल्यामुळे समाजात आपल्याबाबत वेगळा मेसेज गेला आहे. स्वच्छता अभियान राबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. - किसमतअली खान,कारवाईग्रस्त व्यक्ती
हेतू अगदी रास्त, कृती मात्र गंभीरच!
By admin | Published: December 15, 2015 10:40 PM