सुधीर राणे
कणकवली : कणकवली शहराच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रिंगरोडचा आचरा रोड ते गांगोमंदिर हा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. तर गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिर आणि तेथून रवळनाथ मंदिर या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम नगरपंचायतीने सुरू केले आहे. पाच टप्प्यात प्रस्तावित असलेला हा रिंगरोड नियोजनाप्रमाणे लवकर पूर्ण झाल्यास कणकवली शहर विकासाच्या दृष्टीने पथदर्शी ठरणार आहे.कणकवलीतील सर्व वाड्यांना जोडणारा हा रिंगरोड शहर विकास आराखड्यात सन १९९९ मध्ये समाविष्ट करण्यात आला होता. मात्र, निधीची कमतरता तसेच भूसंपादन प्रक्रियेतील अडथळे, काही जागा मालकांचा विरोध यामुळे हे काम मार्गी लागले नव्हते. एप्रिल २०१८ मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली बंडू हर्णे आणि सहकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर या रिंगरोडला प्राधान्य दिले. त्यानुसार रिंगरोडचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
त्याचे लोकार्पण गुरुवारी केले जाणार आहे. तर पुढील वर्षभरात दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण होणार आहे. निधीची उपलब्धता झाली तर चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील रिंगरोडचेही काम पुढील दोन वर्षात मार्गी लावण्याचा निर्धार नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केला आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील रिंगरोडच्या भूसंपादनासाठी सुमारे दोन कोटींचा खर्च येणार आहे. त्यासाठीची तरतूदही नगरपंचायतीने केली आहे. या रिंग रोडचा पहिला टप्पा आचरा रोड ते गांगो मंदिर, दुसरा टप्पा गांगोमंदिर ते चौंडेश्वरी मंदिर,तिसरा टप्पा चौडेंश्वरी मंदिर ते रवळनाथ मंदिर, चौथा टप्पा रवळनाथ मंदिर ते दत्तमंदिर बांधकरवाडी तिठा व पाचवा टप्पा नरडवे तिठा, बिजलीनगर, नेहरू नगर ते आशिये रोड असा आहे.अविकसित भाग होणार विकसितशहरातील बाजारपेठ आणि रेल्वेस्थानक रोड परिसरातच मोठ्या प्रमाणात निवासी, व्यापारी बांधकामे झाली. मात्र ,शहराचा उत्तर आणि पूर्व दिशेचा ६० टक्के भाग अंतर्गत रस्त्यांचे जाळे नसल्याने अविकसित राहिला आहे. हा भाग या रिंग रोडमुळे विकसित होणार आहे.