सुरेश बागवे- कडावल--सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या घोडगे गावातील धबधबा पर्यटकांना खुणावू लागला आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या या धबधब्याचा वर्षा पर्यटनस्थळ म्हणून विकास होणे गरजेचे आहे.कुडाळ तालुक्यातील घोडगे परिसर अतिदुर्गम आहे. घोडगे गावाच्या पूर्व व उत्तर दिशेने सह्याद्री पर्वताच्या विस्तीर्ण रांगा पसरल्या आहेत. घोडगे घाटाच्या पायथ्याशी विसावलेल्या या गावाला भौगोलिक रचनेमुळे एक वेगळेच नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. अशाच एका उंच कडेकपारीतून गावात धबधबा कोसळत आहे. या धबधब्याचे सौंदर्य लाजवाब असून, पर्यटकांचे पाय आता प्रत्यक्ष स्थळाकडे वळू लागले आहेत.या धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांची आता काही प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. कोल्हापूर व सिंधुदुर्ग यांच्या मध्यभागी हा परिसर येतो. धबधब्याबरोबरच आसपासच्या उंच डोंगर रांगांमुळेही परिसराला अभिजात सौंदर्य लाभले आहे.वर्षा पर्यटनातून विकासाची गरजया परिसराकडे जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पणदूर येथून सुमारे २५ किलोमीटर, तर कणकवली येथून सुमारे ३० किलोमीटर अंतर पर्यटकांना कापावे लागते. तर घोडगे बाजार येथून हा धबधबा अवघ्या पाच किलोमीटरवर आहे. या भागाचा वर्षा पर्यटन म्हणून विकास झाल्यास पर्यटक अधिक संख्येने आकर्षित होऊ शकतील. वाढत्या विकासाबरोबरच स्थानिक तरूणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत. याबाबत लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर विचार होणे आवश्यक आहे.
घोडगेच्या धबधब्याकडे पर्यटकांचा वाढता ओघ
By admin | Published: October 13, 2015 11:09 PM