कणकवली : कोणत्याही कलेचा सातत्यपूर्ण सराव कलाकाराला समृद्धच करीत असतो. शास्त्रीय संगीतातही रियाज महत्वपूर्ण असतो. सातत्यपूर्ण संगीत विचार आणि गुरु सानिध्य संगीत साधकाला परिपूर्ण बनविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. असे मत गोव्याच्या नामवंत गायिका डॉ.शिल्पा डुबळे -परब यांनी येथे व्यक्त केले.आशिये येथील श्री दत्त क्षेत्र येथे गंधर्व फाउंडेशनच्यावतीने रविवारी २५ व्या गंधर्व शास्त्रीय संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय कात्रे यानी घेतलेल्या मुलाखतीत डॉ.शिल्पा डुबळे -परब यानी संगीत विषयक दिलखुलास व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.यावेळी त्यांनी कलाकार व श्रोत्यांची जबाबदारीही प्रकर्षाने मांडली. तसेच आपले प्राथमिक संगीत शिक्षण ते डॉक्टरेट पर्यतचा जीवन प्रवासही उलगडला.त्यांनतर डॉ.शिल्पा डुबळे - परब यानी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यानी मैफिलीची सुरुवात राग 'पुर्वी' ने केली. त्यानंतर राग 'नंद 'सादर केला.उपशास्त्रीय प्रकारात त्यांच्या ठुमरी नंतर संत तुकाराम यांची रचना 'पद्मनाभा नारायणा',नाट्य पद 'घाई नको बाई अशी '(धाडीला राम तिने का वनी),भैरवी (मीरा भजन ) सादरीकरणाने श्रोते सुखावले.त्याना तबलासाथ गोव्याचे नामवंत तबलावादक रोहिदास परब (पं.बापू पटवर्धन ,पं.मोहन बळवल्ली यांचे शिष्य)यानी तर हार्मोनीयम साथ प्रसाद गावस (राया कोरगावंकर व पद्मश्री पं.तुळशिदास बोरकर यांचे शिष्य)यानी केली.तानपुरा साथ प्रियांका मुसळे (बाळ नाडकर्णी यांची शिष्या)यानी केली.गंधर्व सभेच्या या मैफिली साठी ठाणे येथील संगीत अभ्यासक, समीक्षक, लेखक सदाशिव उर्फ सुहास बाक्रे यांची विशेष उपस्थिती लाभली .त्यांचे दामोदर खानोलकर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सदाशिव बाक्रे यानी गंधर्व सभा आयोजनाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.या सभेस सुप्रसिद्ध गीतकार व कवी मिलिंद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ध्वनीसंयोजन नाना व बापू डंबे यानी केले. ही गन्धर्व सभा यशस्वी होण्यासाठी अभय खडपकर,मनोज मेस्त्री,संतोष सुतार,किशोर सोगम,दामोदर खानोलकर,विलास खानोलकर,,सागर महाडिक,शाम सावंत, विजय घाटे व करंबेळकर परिवार यानी विशेष प्रयत्न केले .पुढिल गंधर्व सभा २४ फेब्रुवारी रोजी !या पुढील गंधर्व संगीत सभा २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथील गायक मंदार गाडगीळ सजवणार आहेत.त्यावेळी रसिकांनी उपस्थित रहावे. असे आवाहन गंधर्व फाऊंडेशनच्यावतीने यावेळी करण्यात आले.
शास्त्रीय संगीतात रियाज महत्वपूर्ण : शिल्पा डुबळे -परब यांचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 6:13 PM
कोणत्याही कलेचा सातत्यपूर्ण सराव कलाकाराला समृद्धच करीत असतो. शास्त्रीय संगीतातही रियाज महत्वपूर्ण असतो. सातत्यपूर्ण संगीत विचार आणि गुरु सानिध्य संगीत साधकाला परिपूर्ण बनविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. असे मत गोव्याच्या नामवंत गायिका डॉ.शिल्पा डुबळे -परब यांनी येथे व्यक्त केले.
ठळक मुद्देशास्त्रीय संगीतात रियाज महत्वपूर्ण : शिल्पा डुबळे -परब यांचे मत गंधर्व शास्त्रीय संगीत सभा