कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडलेले आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या रखडलेल्या कामासाठी कोकणी माणूस जबाबदार असल्याचे म्हटले आहे, हे चुकीचे आहे. कोकणी माणसाला त्यांनी बदनाम करु नये. पहिल्यांदा या रस्त्यावरुन गाडीतून फिरावे, मग त्यांना सत्य परिस्थिती समजेल. 'गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला आहे', असा टोला मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी लगावला. कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाविषयी केंद्रीय मंत्री गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये कोकणातील माणसांमुळे या महामार्गाचे काम रखडले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, ते काम रखडण्यास ठेकेदार आणि प्रशासन जबाबदार आहे. गडकरी हे चांगले काम करतात. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. मात्र, त्यांनी विनाकारण कोकणी माणसाला दोष देऊ नये. ते आता पुस्तक लिहिणार आहेत. त्यात महामार्ग उभारताना प्रशासनाकडून कशा चुका झाल्या याबाबतही त्यांनी लिहावे.कोकण रेल्वेसाठी विना आंदोलन येथील जनतेने जागा दिली. मग फक्त मुंबई-गोवा महामार्ग भूसंपादन करतानाच त्रास का झाला? याचा विचार त्यांनी करावा. गडकरी यांनी सध्या काम पूर्ण झालेल्या महामार्गावरून एकदा गाडीने फिरावे, त्यांना नक्कीच खरी स्थिती समजेल. त्यानंतर त्यांनी पुणे- बेंगलोर रस्त्याने गाडीने फिरावे. दोन्ही रस्त्यांच्या बांधकामातील फरक त्यांच्या लक्षात येईल. या महामार्गावरील बारा पूल बांधण्याचे काम ज्या ठेकेदाराला दिले त्याचा पूर्ण इतिहास तपासला गेला नाही त्यामुळे ते काम रखडले.दिलीप बिल्डकॉनने कणकवली येथे बांधलेला बॉक्सेल कोसळला. तसेच अनेक ठिकाणी महामार्गावर तडे गेले. काही ठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे कोकणातील नागरिक कंटाळल्याने न्यायालयात गेले. वेळप्रसंगी आंदोलने केली त्याचा दोष नागरिकांना देऊ नये. महामार्ग कामाची पाहणी केली तर कणकवलीतील उड्डाणपुलावरील धबधबे आणि खड्डे दिसतील. त्यामुळे गडकरी यांनी कोकणी माणसाबद्दल बोलू नये. समृध्दी महामार्ग ज्या गतीने केला, त्या धर्तीवर हा रस्ता केला पाहिजे होता. मात्र,तसे झाले नाही असेही उपरकर म्हणाले.
गडकरी साहेब..कोकणातील रस्ता कोकणी माणसामुळे नव्हे तर प्रशासनामुळे रखडला, परशुराम उपरकरांचा टोला
By सुधीर राणे | Published: August 09, 2023 4:17 PM