ओरोस : शासनाचे रस्ता सुरक्षा अभियान हे सर्वांच्या सुरक्षेसाठी आहे. वाहतूक शाखा व आरटीओ कर्मचारी केवळ आपला महसूल गोळा करण्यासाठी कारवाई करीत नाहीत. ते वाहन चालकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देत असतात. त्यामुळे केवळ दंड होणार म्हणून वाहतूक नियम पाळू नका, तर आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करा, असे सांगतानाच, नागरिकांनी हिट अँड रन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्यायाधीश डी. बी. म्हालटकर यांनी ओरोस फाटा येथे आयोजित रस्ता सुरक्षा अभियानात मार्गदर्शन करताना केले.शासनाच्यावतीने जिल्ह्यात १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांच्यावतीने ओरोस फाटा बॉक्सवेल येथे रिक्षा चालक, वाहन चालक आणि नागरिक यांच्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पोलीस उपअधीक्षक (गृह) संध्या गावडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, रिक्षा चालक, नागरिक आदी उपस्थित होते.यावेळी वाहतूक नियमांबाबत वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना वाहतूक नियम मार्गदर्शन पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी आरटीओ राजेंद्र सावंत म्हणाले, राज्यात होणारे अपघात हे वाहतूक नियम मोडल्याने होत आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर नियंत्रण आणण्यास शासन दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविते. मृत्यूशी टाळायची असेल भेट, तर दुचाकी चालवताना घाला हेल्मेट हे ब्रीदवाक्य यावर्षी निश्चित केले आहे.