मालवण : मालवण एसटी बसस्थानक परिसरात गेले काही दिवस रोडरोमियोंचा वावर वाढला आहे. सकाळच्या सत्रात महाविद्यालये आणि सायंकाळी शाळा, हायस्कूल सुटल्यानंतर अल्पवयीन दुचाकीस्वार टोळक्याने बसस्थानक परिसरात येऊन मुली, युवतींना न्याहाळत असल्याने मुलींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या रोडरोमिओंच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर हालचाल करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.मालवण बसस्थानक हे प्रवाशांच्या वर्दळीने नेहमीच गजबजलेले असते. मात्र शाळा, महाविद्यालये सुटण्याच्या वेळेस रोडरोमियो आणि अल्पवयीन मुले दुचाकीने बसस्थानक परिसरात घिरट्या घालत असतात. त्यामुळे शाळकरी मुली भीतीच्या छायेखाली असून संशयितांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
अलीकडील काळात अंमली पदार्थ सेवनात अल्पवयीन मुले अडकल्याची मुक्तचर्चा होत असताना त्याच नशेत मुलींची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात प्रामुख्याने अल्पवयीन मुले असून त्यांच्याकडे बुलेट सारख्या महागड्या दुचाकी असतात.रोडरोमिओंनी छेडछाड केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी मुलींमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत काही विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालय प्रशासनाला कल्पना दिली आहे, त्यानुसार काही महाविद्यालय प्रशासनाने बसस्थानक परिसरात रोडरोमिओंवर पाळत ठेवली असता त्यांनी तिथून पोबारा केला. त्यामुळे पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.अल्पवयीन मुलांकडून चोररस्त्यांचा वापरपोलिसांना चकवा देऊन अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना बऱ्याचदा चोर रस्त्यांचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यांच्याकडे कसलाही परवाना नसताना बुलेटसह अन्य महागड्या दुचाकी असतात. अल्पवयीन मुले अतिवेगाने दुचाकी चालवत असून पोलीस कारवाई करतील या भीतीपोटी चोररस्ते म्हणजेच शहरातील छोट्या छोट्या गल्ल्यातून वाट काढतात. याबाबत वाहतूक पोलिसांनी काही युवकांवर दंडात्मक कारवाई केली आहे.