कणकवली : कणकवली तालुक्यातील तळेरे बाजारपेठ येथे तब्बल दहा दुकाने व दोन घरे आज, सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानी फोडली. यामध्ये कापड दुकान, मोबाईल शॉपी, भुसारी दुकान, मेडिकल तसेच इतर दुकानांचा समावेश आहे. या जबरी चोरीमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. प्राथमिक शिक्षक राजू बिरादार यांची मोटारसायकलही या चोरट्यांनी लंपास केली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाहणी केली असून या घटनेसंदर्भात तपास सुरु केला आहे.चोरट्यांनी सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांना टार्गेट केले आहे. याबाबत तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी राजू जठार यांनी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेना पोलीस संरक्षण देण्याची आग्रही मागणी केली आहे. या चोरीत सुमारे ४.५ लाखा पेक्षा अधिक रोख रक्कम व एक मोटरसायकल चोरीला गेली आहे. याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस.खंडागळे, हवालदार यू.डी.वंजारे, पोलीस नाईक के.पी.कदम हे अधिक तपास करीत आहेत.
कणकवली तालुक्यातील तळेरेत जबरी चोरी, बाजारपेठेत तब्बल दहा दुकाने फोडली!, चोरटे सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:48 PM