मालवण : सर्जेकोट येथील वसंत रोहिदास आडकर यांच्या मालकीचा ‘हरिप्रसाद’ ट्रॉलर्स मासेमारी करण्यासाठी गेला असता कवडा रॉक परिसरात दहा वाव खोल समुद्रात बुडाला. ट्रॉलरच्या तळाशी छिद्र पडल्याने समुद्र्राचे पाणी आत शिरले. यावेळी ट्रॉलरमधील खलाशांनी आरडाओरडा सुरू केल्याने हरी प्रसाद ट्रॉलर्सच्या शेजारी सदा सारंग यांच्या ‘पुरुषोत्तम’ ट्रॉलर्ससह किनाऱ्यावरील गिलनेट व पातधारक मच्छिमारांनी समुद्र्रात धाव घेत ट्रॉलर्सवरील वसंत आडकर यांच्यासह सातही खलाशांना वाचविण्यात यश मिळविले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान, समुद्राचे पाणी घुसलेल्या हरिप्रसाद ट्रॉलर्सला वाचविण्यात अथक प्रयत्नानंतर मच्छिमारांना अपयश आले. ट्रॉलर व अन्य साहित्य समुद्रात बुडाल्याने सुमारे २५ लाखांचे नुकसान झाले आहे. मासेमारी केलेली लाखोच्या पापलेट व अन्य प्रकारची मासळी पाण्यात बुडाल्याने नुकसान झाले. सर्जेकोट येथून शुक्रवारी रात्री समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘हरिप्रसाद’ या ट्रॉलर्सला सर्जेकोट कवडा रॉक येथे दहा वाव खोल समुद्रात शनिवारी पहाटे जलसमाधी मिळाली. ‘हरिप्रसाद’ ट्रॉलर्समध्ये मालक वसंत आडकर यांच्यासह सत्यवान रसाळ, अशोक घाडी, मंगेश सुर्वे, किशोर बापार्डेकर यांच्यासह एकूण सातजण शुक्रवारी सायंकाळी मालवण समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले होते. (प्रतिनिधी)
कवडा रॉक समुद्रात ट्रॉलर्सला जलसमाधी
By admin | Published: January 31, 2016 1:13 AM