सावंतवाडी : आरोंदा जेटीला परवानगी तत्कालीन उद्योग व बंदरमंत्री नारायण राणे यांनी दिली आहे. त्यामुळे आता जेटीला विरोध हा फक्त पक्ष बदलल्यानेच होत आहे, असा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी काँग्रेसवर केला. मी सर्व परवानग्या घेऊनच जेटीचे काम हाती घेतले आहे. दररोज गाव पुढारी बदलतात; मात्र, आरोप तेच असून आता शासनानेही आरोपांची दखल घेणे बंद केले आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनोज नाईक, सुशांत पांगम, आनंद नेवगी, राजन आरोंदेकर, उमेश कोरगावकर उपस्थित होते.तेली म्हणाले, काँग्रेसला आरोंदा गावाविषयी आताच पुळका आला असून त्यांना जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली आहे. भाजपला या गावात ८०० मते पडली, तर काँग्रेसला अवघी ६३ मते पडली आहेत. याचे भान काँग्रेसच्या नेत्यांनी राखावे. मार्ग बंद केला म्हणून काँग्रेस माझ्यावर आरोप करीत आहे. तो मार्ग जिल्हा परिषदेचा बंद केला नसून मेरीटाईम बोर्डचा बंद केला आहे. हा रस्ता शासनाशी झालेल्या रितसर कराराप्रमाणे बंद केला आहे. यापूर्वी आरोंदा-किरणपाणी जेटीतून बोट जात होती. त्यावेळी लोकांची ये-जा होती. पण आता बोट बंद झाल्याने तिकडे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याना गणेश विसर्जन किंवा अन्य बाबींसाठी जायचे आहे, त्यांना आपण केव्हाही रस्ता खुला करून देण्यास तयार असल्याचेही यावेळी तेली यांनी स्पष्ट केले.मी जेटीचे काम गेली तीन वर्षे करीत असून या जेटीला तत्कालीन मंत्री नारायण राणे यांनीच परवानगी दिली आहे. त्यामुळे त्यांना अंधारात ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आरोंदा ग्रामस्थांनी राणे यांचे अभिनंदनही केले आहे. मी कुठल्याही प्रकारे न्यायालयाचा अवमान केला नाही. तसेच कांदळवनाबाबत रितसर तक्रार झाली होती. त्याचा अहवालही प्राप्त झाला असून त्यात कांदळवन तोडले गेले नसल्याचेही स्पष्ट झाल्याचे वनविभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, अशी माहिती तेलींनी दिली. कोणाला जेटीची तक्रार करायची असल्यास त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जावे आणि तक्रार करावी. मी उत्तर देण्यास सक्षम असल्याचा इशारा यावेळी राजन तेली यांनी दिला. (प्रतिनिधी) पगारी नोकरांबाबत काय बोलावे?जे जेटीबाबत आताच बोलू लागले आहेत, त्यांचा ‘मतलब’ समजून घ्यावा. हे पगारी नोकर असल्यानेच विरोध करीत असून मी कोणत्याही राजकारणात पडणार नाही, असे माजी आमदार राजन तेली यांनी स्पष्ट केले.
आरोंदा जेटीला राणेंनी दिली परवानगी
By admin | Published: December 16, 2014 10:00 PM