- रजनीकांत कदमकुडाळ (सिंधुदुर्ग) : तालुक्यातील नेरूर सायचे टेंब येथील मांड उत्सवामध्ये आकर्षक २० ते २५ फुटांची भव्यदिव्य अशी चलचित्रे, देखावे व पारंपरिक रोंबाटांच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत हा मांड उत्सव पार पडला. कोकणातील प्रत्येक गावामध्ये होळी, शिमगोत्सव सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असून, कुडाळ तालुक्यातील नेरूर गावातील शिमगोत्सवालाही आगळीवेगळी परंपरा व वेगळे महत्त्व असून होळीच्या तिसऱ्या दिवशी येथील साईचे टेंब येथे होणारा मांड उत्सव त्यामध्ये सादर होणारे देवदेवता, राक्षस, प्राणी पक्षी यांचे भव्यदिव्य २० ते २५ फूट उंचीचे चलचित्र असणारे देखावे यांच्या बरोबर पारंपरिक वेशभूषा केलेली सोंग यामध्ये प्रामुख्याने मारुती, राक्षस, भूत, सिंह, मगर तसेच इतर सोंगे तसेच हातात लेझीम घेऊन असणारी लहान मुले असतात. या सर्वांचे सुश्राव्य संगीत साथीवर होत असणारे नृत्य व सादरीकरण हे या मांड उत्सवाचे खास आकर्षण असून हा मांड उत्सव पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर रत्नागिरी तसेच इतर जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांबरोबरच गोवा, कर्नाटक या राज्यातील ही प्रेक्षक दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.यंदा ही हा मांड उत्सव शनिवार ३ मार्च रोजी रात्री झाला. या मांड उत्सवाची सुरुवात सायं. ४ वाजल्यापासून धार्मिक पारंपरिक कार्यक्रमांनी झाली. त्यानंतर रात्री १० वाजता नेरुर सायचे टेंब येथे या शिमगोत्सवाला सुरुवात झाली. यंदाच्या या शिमगोत्सवामध्ये कै. आना मेस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य व आकर्षक असे पक्षी व प्राणी बनविले होते, दिनू मेस्त्री यांच्या ग्रुपने भव्य दिव्य अशी मारुतीची व दोन राक्षसांची प्रतिकृती उभारून रामायणातील एक प्रसंग या देखाव्यातून चित्रित केला होता, बाबा मेस्त्री ग्रुपने अमृतकुंभ अभिलाषा हा राहुकेतूवर आधारित पौराणिक भव्यदिव्य देखावा केला होता, विलास मेस्त्री ग्रुपने देवी कात्यायनी स्वरूप, कालिया मर्दन व कृष्णलीला यावर चार भव्य दिव्य असे २० ते २५ फुटापर्यंतचे पौराणिक देखावे उभारले होते. या देखाव्यां बरोबरच प्रत्येक ग्रुपमध्ये विविध देवदेवता, प्राणी व इतर पात्रे सहभागी होती.
तुफान गर्दी, उत्स्फूर्त प्रतिसादहा मांड उत्सवाचा थक्क करणारा नेत्रदीपक सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच गोवा व कर्नाटक राज्यातील हजारो प्रेक्षकांनी तुफान गर्दी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.