दोडामार्ग : कोनाळ येथील ठाकरवाडीतील हरी अर्जुन ठाकर यांच्या राहत्या घराचे छप्पर कोसळून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या खोलीमध्ये कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी तलाठी यांनी पंचनामा केला. दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने सुरूवात केली असून, या मुसळधार पावसाचा तडाखा कोनाळ-ठाकरवाडीतील हरी अर्जुन ठाकर यांच्या राहत्या घराला बसला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास हरी ठाकर व त्यांचा मुलगा उदय ठाकर झोपले असता घराचे छप्पर अचानक कोसळले. यात एक लाखाचे नुकसान झाले. या प्रकारामुळे हरी ठाकर यांच्यावर संकट निर्माण झाले. कोसळलेल्या छपरामुळे हरी ठाकर व त्यांचा मुलगा उदय यांना वाऱ्यावर राहण्याची वेळ आली आहे. कोसळलेल्या छपरामुळे पूर्ण घरात पाणीच पाणी साचल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या दोन्ही व्यक्ती मोलमजुरी करून कसाबसा आपला उदरनिर्वाह भागवतात. या प्रकारामुळे दोन्ही व्यक्तींना मानसिक धक्का बसल्याचे चित्र दिसत आहे. हरी ठाकर यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कोसळलेल्या छपराची दुरूस्ती करणे कठीण बनले आहे. त्यामुळे तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत करणे गरजेचे आहे. सुदैवाने कोसळलेल्या खोलीमध्ये कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली. हे दैवच म्हणावे लागेल. घटनेची तलाठी अधिकाऱ्यांना माहिती दिली. याबाबत झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
कोनाळमध्ये घराचे छप्पर कोसळले
By admin | Published: July 02, 2016 11:22 PM