अनंत जाधवसावंतवाडी : कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या रांगणा किल्यावर शिवभक्तासह पर्यटकांना ये जा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग रोप-वे करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव सिंधुदुर्ग वनविभागाकडून मागविण्यात आल्याची माहिती समोर आली असून याला सिंधुदुर्ग वनविभागाने ही दुजोरा दिला आहे. सिंधुदुर्गातून रांगणा गडावर जायचे असेल तर अडथळ्यांची शर्यत पार करत पायी जावे लागते. वनविभागाच्या अडथळ्यांमुळे सिमेंटच्या पायऱ्याही करणे शक्य नसल्याने शासन आता रोप-वे चा विचार करत आहे.कोल्हापूर व सिंधुदुर्गच्या सीमेवर असलेल्या ऐतिहासिक अशा रांगणा किल्यावर शिवभक्तासह पर्यटकांची संख्या वाढली आहे. जास्तीत जास्त पर्यटक हे कोल्हापूर जिल्ह्यातून थेट वाहन घेऊन गडावर जातात. त्यामुळे शिवप्रेमी यांचा आनंद घेत असतात. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रांगणा किल्यावर जायचे झाले तर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून किल्यावर जावे लागते.कुडाळ नेरूर मधून हा रस्ता असून त्या रस्त्याने एक व्यक्तीच पायी चालत जाऊ शकते. आजू बाजूला दरी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जण किल्यावर जायचे असेल तर कोल्हापूर जिल्ह्यातील मार्ग निवडतात. त्यामुळे अनेक पर्यटक तसेच शिवभक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गडावर जाण्यासाठी शासनाकडून प्रयत्न झाले पाहिजेत अशी मागणी करत होते.आता या मागणीला यश येताना दिसत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने रांगणा किल्यावर जाण्यासाठी रोप वे करण्यासाठी पुढाकार घेतला असून तसा प्रस्ताव सिंधुदुर्ग वनविभागाकडून मागविण्यात आला आहे. मात्र अद्याप हा प्रस्ताव वनविभागाकडून पाठवण्यात आला नसून जर रांगणा किल्यावर सिंधुदुर्ग जिल्हयाच्या हद्दीतून रोप वे करायचा झाल्यास केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.मात्र अशा प्रकारे रोप वे झाल्यास रायगड किल्यानंतरचा रांगणा हा राज्यातील दुसरा किल्ला असणार आहे. तसेच गडप्रेमी बरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढण्यास मदत होणार आहे.
रांगणा किल्यावर रोप-वे साठी प्रस्ताव मागवला असून आम्ही तसा प्रस्ताव पाठवला. यावर दोन ते तीन दिवसापूर्वीच चर्चा झाल्याचे सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी सांगितले.