मेहरून नाकाडे / रत्नागिरी प्रत्येक प्राथमिक शाळेत प्रयोगशाळा असेलच असे नाही, प्राथमिक शाळांमध्ये विज्ञान रूजावे यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा वाढावी, तसेच अभ्यासातील क्लिष्ट प्रयोग सोपे करून सांगताना लांजा तालुक्यातील सरस्वती विद्यानिकेतन खावडीच्या अध्यापिका दामिनी भिंगाडे यांनी फिरती प्रयोगशाळा तयार केली आहे. विविध शाळांमधून त्यांनी २०० ते २५० प्रयोग दोन ते अडीच हजार विद्यार्थ्यांना विनामूल्य सादर करून दाखवितात. लांजा तालुका विज्ञान मंडळाच्या उपाध्यक्षपदी १९ वर्षे तर अध्यक्षपदी गेले वर्षभर दामिनी भिंगार्डे कार्यरत आहेत. मंडळातर्फे गेली २० वर्षे अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये माध्यमिक शाळातील शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी सीमित होते. मात्र संबंधित माध्यमिक शिक्षकांनी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले. प्रयोगशाळा तयार करण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करण्याचा प्रश्न आला तेव्हा जि.प.सदस्य कदम यांनी लागलीच दहा हजाराची रक्कम पुढे केली. लोक सहभागातून ६५ हजार रूपयांचे साहित्य असलेली फिरती प्रयोगशाळा तयार केली आहे. मुंबई, पुण्याबरोबर लगतच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातही फिरती प्रयोगशाळा होती. मात्र रत्नागिरीत भिंगार्डे यांनी तयार केलेली पहिली प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेत ६० प्रकारची उपकरणे आहेत. शिवाय इंग्रजी, मराठी भाषेतील लॅमिनेट केलेल्या प्रयोगाच्या माहितीच्या पट्ट्या आहेत. दोन तास विद्यार्थ्यांना गटागटाने प्रयोग उपकरणे स्वत: हाताने हाताळून प्रयोग करावयास देण्यात येतात. संपूर्ण दिवसभर शाळेत ओळख विज्ञानाची प्रयोग राबविण्यात येतो. निम्म्या विद्यार्थ्याना एलसीडीवर मंगलयान, चांद्रयान मोहिम, अभ्यासक्रमातील व रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या वनस्पती, सभोवतालचे प्राणी जीवन, स्वच्छता मोहीम, वैयक्तिक आरोग्याची काळजी याबाबत माहिती देण्यात येते. त्याचवेळी निम्या विद्यार्थ्यांना प्रयोग दाखविले जातात. चार चार विद्यार्थ्यांचे गट तयार करून २५ प्रयोग विद्यार्थी करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यास प्रयोग हाताळता येतो. त्यामुळे प्रयोग लक्षात राहण्याबरोब वैज्ञानिक साहित्य हाताळण्याबरोबर प्रयोग करण्याचा आनंदही लाभतो. माध्यमिक शिक्षकांनी प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेला प्रयोग असून जिल्ह्यातील पहिलाच असल्याने भिंगार्डे यांचे कौतुक करण्यात येत आहे. तत्कालिन गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, व सध्याचे गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी भिंगार्डे यांची प्रयोगशाळा तालुक्यातच नव्हे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांत फिरत आहे. प्रभाकर सनगरे, विद्येश फणसे, सर्जेराव पाटील या सहकारी शिक्षकांचेही सहकार्य भिंगार्डे यांना लाभत आहे. त्यामुळे तीन मोठ्या पेट्यांमधून साहित्य भरून ज्या शाळेतून मागणी केली जाते, त्याठिकाणी साहित्य भिंगार्डे व सहकारी स्वखर्चाने नेतात घेतात. केंद्रशाळा निहाय एक दिवसीय मेळावा आयोजित करून प्रयोगाची माहिती दिली जाते. मात्र एखादी केंद्रशाळा पैसे देत असली तरी आपण नाकारत नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकसहभागातून तयार केली फिरती प्रयोगशाळा
By admin | Published: September 05, 2015 11:53 PM