पुरळ : निसर्गातील होणारा अचानक बदल मंगळवारी देवगडमधील चांभारभाटी परिसरातील मच्छीमारांनी अनुभवला. सोमवारच्या अमावस्येचा परिणाम मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास जाणवला. देवगड येथील आनंदवाडी प्रकल्प ते चांभारभाटी भागातील रस्त्यावर उधाणाचे पाणी आल्यामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.या भागातील काही मच्छीमार व्यावसायिकांच्या मच्छीमार नौका समुद्राबाहेर सुरक्षितपणे किनाऱ्यावर ठेवण्याचे काम सुरू असताना अचानक उधाणाचे पाणी रस्त्यावर आल्याने या परिसरातील नागरिकांची तारांबळ उडाली. या उधाणाच्या पाण्याचा जोर पाहता येथील जाणकार मच्छीमार व्यावसायिकांच्या मते लवकर पावसाळा सुरू होण्याची ही चाहूल आहे. उधाणाच्या भरतीमुळे हा परिसर जलमय झाल्याचे दिसून येत होता. मच्छीमारांचे साहित्य व मासे ठेवण्यासाठीच्या झोपड्यांमध्ये उधाणाचे पाणी शिरले. (वार्ताहर)
देवगडमध्ये उधाणसदृश परिस्थिती
By admin | Published: May 19, 2015 10:24 PM