सावंतवाडी : मडुरा रेखवाडी येथे हत्तीला रेल्वेची धडक बसून अपघात घडल्याची बातमी सोशल मिडियावरून व्हायरल झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. मात्र, रविवारी सायंकाळी कोकण रेल्वेच्यावतीने प्रसिद्धी पत्रक काढून हा अपघातसिंधुदुर्ग जिल्ह्यातील मडुरा येथे झाला नसून, सोशल मिडियावर अफवा पसरविण्यात येत असल्याचा खुलासा केला आहे.
मडुरा रेखवाडी येथे जंगलात जाणारा हत्ती रेल्वेच्या रूळावर आला असता समोरून येणाऱ्या रेल्वेने या हत्तीला जोरदार धडक दिली. या धडकेत हत्ती गंभीर जखमी झाला असून, हत्तीच्या मागील भागाला गंभीर इजा झाली आहे. तेथून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे. तसेच रेल्वेने धडक दिल्याने रेल्वेच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारचे फोटो सोशल मिडियावरून रविवारी सकाळपासून व्हायरल होत होते. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही भागातून हे फोटो पुन्हा पुन्हा फिरून येत होते.
मडुरा रेखवाडी हा भाग सावंतवाडी तालुक्यात येत असल्याने अनेकजण संभ्रमात पडले होते. ते सतत सावंतवाडीत दुरध्वनीवरून संर्पक करत होते. मात्र, हा सर्व प्रकार उशिरा रेल्वे प्रशासनाला सांगण्यात आला. त्यानंतर कोकण रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, मडुरा रेखवाडी येथे अशा प्रकारचा अपघात झाला नाही. आजही झाला नाही आणि यापूर्वीही कधी झाला नव्हता. त्यामुळे हे फोटो अफवा पसरविण्यासाठी पसरवले जात आहेत, असे जाहीर करण्यात आले.
दरम्यान काहींच्या मते हा अपघात आंध्रप्रदेश किंवा कर्नाटक राज्यातील असावा. यापूर्वी हत्तीला रेल्वेने धडक दिल्याच्या घटना त्या राज्यात अधिक घडल्या आहेत. मात्र, असा अपघात कधीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हत्तीचा अपघात सिंधुदुगार्तील नव्हे : वनविभागसोशल मिडियावर व्हायरल झालेले हत्तीचे फोटो व क्लीप ही मडुरा येथील नाही. आम्ही खात्री केली. तो प्रकार दुसऱ्या ठिकाणचा आहे. सद्यस्थितीत फक्त दोडामार्गमध्ये तीन हत्ती आहेत. त्यामुळे लोकांनी अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये, असा खुलासा सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी केला आहे.