देवगड : आॅस्ट्रेलिया व भारत यांच्यामधील संबंध दृढ व्हावेत यासाठी आॅस्ट्रेलियाचे धावपटू पॅट फार्मर जिल्हा भेटीवर येत आहेत. गुरुवारी (दि. ११) सकाळी त्यांचे देवगड तालुक्यात आगमन होणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने आयोजित केलेल्या ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’ या उपक्रमांतर्गंत भारतातील कन्याकुमारी ते श्रीनगर असा सुमारे ४ हजार किलोमीटरचा पायी प्रवास ते करणार आहेत.११ फेब्रुवारीला सकाळी तालुक्यातील मुणगे येथे त्यांचे आगमन होईल. धावतच त्यांचा तालुका दौरा राहणार आहे. मुणगे येथे स्वागत झाल्यानंतर पडेल तिर्लोटमार्गे ते रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करतील. त्यांचे तालुक्यात ठिकठिकाणी स्वागत व्हावे यासाठी रविवारी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी संतोष भिसे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक झाली. यावेळी नायब तहसीलदार अशोक शेळके, नायब तहसीलदार विलास जाधव, पोलीस निरीक्षक मधुकर आभाळे, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. कोंडके, शाळांचे मुख्याध्यापक तसेच कर्मचारी उपस्थित होते. कोकणच्या संस्कृतीचे दर्शन आॅस्ट्रेलियाच्या धावपटूंना घडावे यासाठी खास नियोजन करण्यात येणार आहे. त्यांचे उत्साही स्वागत कसे करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील धावपटूंची तसेच अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंची त्यांच्याशी ओळख घडवून आणली जाणार आहे. आपल्याकडील विविध कलागुणांचे दर्शन त्यांना व्हावे यासाठी ठिकठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन होणार आहे. कोकणची ओळख त्यांच्या स्मरणात रहावी यादृष्टिने त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी९ फेब्रुवारी रोजी दुपारनंतर गोवामार्गे पॅट फॉर्मर यांची दौड सातार्डा येथील ब्रीज जवळ येणार असून त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी स्वागत कमान उभारण्यात आली आहे. ढोल, ताशा, लेझीम पथकाच्या गजरात सातार्डा गावातील महिला पॅट फार्मर यांचे औक्षण करतील. त्यानंतर वेंगुर्ले येथील गोळवण बीच येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
धावपटू ‘पॅट फार्मर’ गुरुवारी देवगडात
By admin | Published: February 08, 2016 12:02 AM