तळेरे : मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली तालुक्यातील नांदगाव असलदे तावडेवाडी पियाळी नदी येथे वाहत्या पाण्यात अज्ञाताने पोतीमध्ये भरून ब्रॉयलर कोंबड्या टाकल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र संबधित कोंबड्या मृत झाल्यानंतर टाकल्या की जीवंत पोत्यात भरून नदी पात्रात टाकल्या याबाबत निश्चीत माहिती समजू शकलेली नाही. या कोंबड्यांची पोती असलदे ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.
तसेच या नदी शेजारीच नांदगावं व असलदे ग्रामपंचायतच्या नळपाणी योजनेच्या विहिरी असल्याने या विहीरीचे पाणी दूषित होऊ नये यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीनी टी.सी.एल. पावडर टाकून पाणी शुध्दीकरण करण्यात आले. ही घटना आज निदर्शनास आली. सध्या कोरोनाचा फैलाव होत असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत घटनेची माहिती मिळताच असलदे सरपंच पंढरी वायंगणकर, नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर, नांदगांव ग्रामविस्तार अधिकारी हरमळकर, असलदे ग्रामसेवक आर. डी. सावंत, ग्रामपंचायत सदस्य मजीद बटवाले, अरूण बापार्डेकर, भाई मोरजकर, नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, श्रीकांत नार्वेकर, असलदे ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश वाळके, सत्यवान घाडी, मधुसुदन परब तसेच आरोग्य कर्मचारी आदींनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. या घटनेची माहिती सरपंच पंढरी वायंगणकर यांनी पोलिसांना दिली.
यावेळी कणकवली येथून पोलीस राजकुमार खाडे, व कासार्डे पोलीस दुरक्षेत्राचे रमेश नारनवर यांनी येत घटनास्थळाची माहिती घेतली. दरम्यान, या प्रकाराने नदीतील पाणी दूषित होण्याची भीती निर्माण झाली आहे.