सावंतवाडी : मोती तलावाच्या काठावर असलेलाच आठवडा बाजार योग्य आहे. त्यामुळे बाजाराचे अन्यत्र स्थलांतर करण्यास ठाकरे गटाचा विरोध आहे. हा आठवडा बाजार हलवू नये, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिली. दरम्यान शहरातील अन्य विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यावरून मतदारांची नजर हटविण्यासाठी मंत्री दीपक केसरकर यांनी बाजार स्थलांतरांवरून वाद निर्माण केला असल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. ते आज, बुधवारी सावंतवाडीत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आठवडा बाजार हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तसे निर्देश मंत्री केसरकर यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राऊळ बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुका संघटक मायकल डिसोजा, योगेश नाईक, गुणाजी गावडे, महिला तालुका संघटक रश्मी माळवदे, श्रुतिका दळवी, साधना कळंगुटकर, शहर प्रमुख शैलेश गवंडळकर, शब्बीर मणियार, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, फिलिप्स रोड्रिक्स उपस्थित होते.राऊळ म्हणाले, शहरातील मल्टीस्पेशालिटी, बस स्थानक असे प्रश्न प्रलंबित असताना केसरकारांनी आठवडा बाजार हलवून नवीन वाद निर्माण केला आहे. बाजार हलवताना कोणत्याही नागरिकांना विचारात घेतले नाही. अनेकांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी बाजार योग्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बाजार कुठेही हलविण्यात येऊ नये, अशी आमची भूमिका आहे.ज्या ठिकाणी आपण बाजार नेतो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले त्या ठिकाणी साधी शौचालयाची व्यवस्था नाही. चार ठिकाणी बाजार हलवल्यानंतर सर्वसामान्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे हा बाजार स्थलांतरित करू नये. याबाबत आम्ही लवकरच जिल्हाधिकारी तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन आमची भूमिका कळविणार आहोत. त्यामुळे घेतलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही राऊळ यांनी यावेळी केली.केसरकर घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध मंत्री दीपक केसरकर हे घोषणा मंत्री असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले असून ते फक्त घोषणाच करतात आता तर मल्टीस्पेशालिटीला ८० टक्के परवानगी मिळणे सोपे झाले असे सांगतात. मग तीन वर्षापूर्वी भूमिपूजन कशासाठी केले ही जनतेची फसवणूक नाही का? असा सवालही राऊळ यांनी केला.
सावंतवाडीतील आठवडा बाजार स्थलांतरावरुन वाद, रुपेश राऊळांचा मंत्री केसरकरांवर आरोप; म्हणूनच..
By अनंत खं.जाधव | Published: March 29, 2023 4:49 PM