वैभववाडी : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीत ग्रामविकास आघाड्यांनी वर्चस्व मिळविले. ग्रामविकास आघाडी ५, काँग्रेस ३, भाजप ३ तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा प्रत्येकी एक सरपंच झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निकालावेळी काँग्रेसने ११ तर भाजपाने ६ ग्रामपंचायतीवर केलेले दावे सपशेल फोल ठरले आहेत. वेंगसर आणि कोकिसरे वगळता उर्वरित ११ ग्रामपंचायतीच्या निवडी बिनविरोध पार पडल्या.काँग्रेस पक्षाच्या पॅनलमधून निवडून आलेले रामदास पावसकर यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपा पुरस्कृत पॅनेलमधून विजयी झालेले अनिल बेळेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने वेंगसरची निवड लक्षवेधी ठरली होती. त्यानुसार सरपंचपदासाठी भाजपच्या पावसकरांविरोधात काँग्रेसचे बेळेकर तर उपसरपंचपदासाठी भाजपच्या संध्या घाडींच्या विरोधात वैशाली बंदरकर यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे वेंगसरमध्ये बहुमताने भाजपचे पावसकर आणि घाडी यांची निवड झाली. कोकिसरे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी ग्रामविकास आघाडी आणि काँग्रेस अशी निवडणूक झाली. २ सदस्य पोटनिवडणुकीत विजयी झाल्याने त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. त्यामुळे पाच मते मिळवून ग्रामविकास आघाडीने काँग्रेसवर सरशी केली. त्यामुळे सुप्रिया नारकर आणि श्रीकांत डफळे यांची अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदी ५ विरुद्ध ४ मतांनी निवड करण्यात आली. तालुक्यात ग्रामविकास आघाड्यांनी सरशी केली. ऐनारी, सांगुळवाडी, नाधवडे, कोकिसरे, खांबाळे या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. तर मांगवली, एडगाव आणि वेंगसरमध्ये भाजपचे तर भुईबावडा, सोनाळी आणि आचिर्णेत काँग्रेसचे सरपंच, उपसरपंच विराजमान झाले. कुंभवडे शिवसेनेने आणि लोरे ग्रामपंचायत राष्ट्रवादीने कायम राखले आहे. ग्रामपंचायतनिहाय सरपंच - उपसरपंच पुढीलप्रमाणे : खांबाळे (ग्रामविकास आघाडी) - समिक्षा गुरव (सरपंच), लवू साळुंखे (उपसरपंच), मांगवली (भाजपा) - राजेंद्र राणे (सरपंच), संतोष इस्वलकर (उपसरपंच), एडगाव (भाजपा) - राजेंद्र सुतार (सरपंच), रुक्मिणी शेळके (उपसरपंच), आचिर्णे (काँग्रेस)- सविता बुकम (सरपंच), सुशिल रावराणे (उपसरपंच), नाधवडे (ग्रामविकास आघाडी) - विष्णू पावसकर (सरपंच), साक्षी कदम (उपसरपंच), ऐनारी (ग्रामविकास आघाडी) - संतोष भुतारणे (सरपंच), दत्ताराम चाळके (उपसरपंच), सोनाळी (काँग्रेस) - समाधान जाधव (सरपंच), प्रतिमा कुडाळकर, कुंभवडे (शिवसेना), वैशाली सावंत (सरपंच), संजय आमकर (उपसरपंच), लोरे (ग्रामविकास आघाडी) - दीपक पाचकुडे, मंगला पेडणेकर. सांगुळवाडी (ग्रामविकास आघाडी) - प्रकाश रावराणे (सरपंच), शर्वरी जाधव (उपसरपंच), भुईबावडा (काँग्रेस) - श्रेया मोरे (सरपंच), रमेश मोरे (उपसरपंच), कोकिसरे (ग्रामविकास आघाडी) - सुप्रिया शंकर नारकर (सरपंच), श्रीकांत हरी डफळे, वेंगसर (भाजपा) - रामदास गोविंद पावसकर (सरपंच), संध्या संदीप घाडी (उपसरपंच). (प्रतिनिधी)
वैभववाडीत ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व
By admin | Published: August 04, 2015 11:52 PM