सावंतवाडी : गोव्याहून सिंधुदुर्गातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या दोघा रशियन पर्यटकांवर कलंबिस्त शिरशिंगे सिमेवर चक्क गव्याने हल्याचा प्रयत्न केला. पण देव बलवत्तर म्हणून हे पर्यटक थोडक्यात बचावले. यात त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती असेच म्हणावे लागेल.मनुष्यवस्थेत सध्या गव्यांचा वावर वाढला आहे अनेक ठिकाणी गवे थेट मनुष्यावर हल्ला करत आहेत. सावंतवाडी तालुक्यात तर मागील महिन्याभरात चार ते पाच ठिकाणी गव्यांनी माणसांवर हल्ले केले आहेत. हा प्रकार ताजा असतानाच आज कलंबिस्त शिरशिंगे सिमेवर गव्यांनी विदेशी पर्यटकांना आपले लक्ष्य केले.दोन रशियन पर्यटक हे गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कलंबिस्त शिरशिंगे भागात आले होते. त्याचवेळी रस्त्यावरून जाताना अचानक त्यांच्यासमोर दोन गवे आले आणि त्यांच्या दुचाकीला धडक दिली.ही धडक एवढी जबरदस्त होती कि हे रशियन पर्यटक थोडक्यात बचावले. पण ते खाली कोसळून जखमी झाले. मात्र स्थानिक ग्रामस्थांकडून धावाधाव करून त्यांना अधिक उपचारासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून सावंतवाडी येथे अधिक उपचारासाठी आणण्यात आले होते. या पर्यटकांची सध्या प्रकृती स्थिर असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. वनविभागासमोर आव्हान
- गव्यांनी विदेशी पर्यटकांना लक्ष्य केल्याने वनविभागासमोर आता आव्हान उभे राहिले आहे.
- कारण मोठ्या प्रमाणात सुट्टीच्या काळात पर्यटक आजूबाजूच्या गावात पर्यटनासाठी आल्यावर त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ले झाल्यास पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास धजावणार नाहीत.
- त्यामुळे वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे बनले आहे. वनविभागाने यावर कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे.