रत्नागिरी : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, मुंबईकर कोकणाकडे निघाले आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या गाड्या पुणे-कोल्हापूरमार्गे वळवण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नेहमीच्या मार्गावरून या गाड्या धावणार असल्याची माहिती रत्नागिरी विभाग विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी दिली. यावर्षी कोकणात १९०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून, गतवर्षीपेक्षा यावर्षी २०० गाड्या जादा आहेत. पैकी रत्नागिरी विभागामध्ये १४०० गाड्या येणार आहेत. अवजड वाहतूकदारांसाठी मुंबई-गोवा महामार्ग बंद केल्याने त्यांचा मोर्चा स्वाभाविकच पुणे, सातारा, कोल्हापूर मार्गावर वळणार आहे. गणपतीसाठी कोकणात खासगी कारने जाणारे अनेक प्रवासीही याच मार्गाने जातात. या मार्गावर आधीच वाहतुकीचा भार असताना एस. टी.च्या १९०० जादा गाड्या या मार्गावरून वळविल्या, तर वाहतुकीची प्रचंड कोंडी होण्याचा धोका असल्याचे एस. टी. प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिवाय ८० ते ९० किलोमीटरच्या जादा अंतरामुळे मुंबईकरांना प्रवासाचा त्रास होईल. शिवाय इंधनाचा वापर वाढेल. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एस. टी.ला १५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. शिवाय मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी वेळेत पोहोचणे शक्य होणार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. संबंधित बाबी लक्षात घेऊन एस. टी.ची वाहतूक पूर्वीच्या मार्गावरून वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळातर्फे सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाकरिता मुंबईकरांना गावी आणण्यासाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गतवर्षी मुंबई, ठाणे, पालघर येथून १७११ गाड्या कोकणात आल्या होत्या. यावर्षी १९०० जादा गाड्या प्रवाशांना घेऊन येणार आहेत. त्यासाठी महामंडळाने महामार्गावर गस्तीपथक, चेकपोस्ट, नियंत्रण कक्ष सुविधा उभारली आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, गावापासून रेल्वेस्थानक दूर असल्यामुळे मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी एस. टी. प्रशासनातर्फे रेल्वेस्टेशनपासून बसस्थानकापर्यंत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.महामार्गावर नियंत्रण कक्ष व चेकपोस्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कशेडी व पोलादपूर येथे चेकपोस्ट उभारण्यात येणार आहे. चिपळूण, शिवाजीनगर व संगमेश्वर येथे नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. शिवाय कर्मचाऱ्यांचे फिरते गस्तीपथक अहोरात्र महामार्गावर तैनात करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
एस. टी.चा मार्ग न बदलण्याचा निर्णय
By admin | Published: August 26, 2014 10:39 PM