वैभव साळकरदोडामार्ग : आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्रित करून त्यांच्या अंध:कारमय जीवनात प्रकाशाचे किरण आणणारे दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील साबाजी सावंत सामाजिक कार्यकर्त्यांसाठी आदर्श ठरत आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून स्वत:ची पदरमोड करीत आर्थिक विषमतेची कवाडे बाजूला सारून अपंग आणि निराधारांसाठी त्यांचे सुरू असलेले कार्य थक्क करणारे आहे.तळकट पंचक्रोशीतील कोलझरसारख्या ग्रामीण भागात सामाजिक कार्य करीत असताना साबाजी सावंत यांना अनेक अनुभव आले. अपंग आणि निराधार व्यक्तींना जीवन जगत असताना आयुष्याचा गाडा चालविण्यासाठी कोणकोणत्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते, याची प्रचीती त्यांना आली आणि तेव्हाच त्यांनी तालुक्यातील अपंग व्यक्ती आणि निराधारांना एकत्र करून त्यांच्यासाठी कार्य करण्याचा निश्चय केला आणि आपल्या संकल्पपूर्ततेच्या दिशेने वाटचाल सुरू केली.गावागावात फिरत असताना एखादी व्यक्ती अपंग आहे, पण तिच्याकडे दाखला नाही आणि दाखला नसल्याने ती व्यक्ती शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नाही, असे अनेक प्रकार समोर आले. त्यामुळे सर्वात प्रथम त्यांनी तालुक्यातील अपंग व निराधार व्यक्तींना एकत्र करून संघटनाबांधणीच्या दृष्टीने प्रयत्न केले. तालुक्यात दिव्यांग बांधवांची संघटना होती खरी, पण ती म्हणावी तशी कार्यरत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सावंत यांनी दिव्यांग सेवा संघ नावाची संघटना स्थापन करून तिला उर्जितावस्था देण्यास सुरूवात केली.
तालुक्यातील ९५७ दिव्यांग बांधवांना त्यांनी एकत्र केले. आणि ज्यांचे दाखले नव्हते, अशा दिव्यांग बांधवांचे प्रथम दाखले तयार केले. त्यानंतर त्यांनी निराधार महिलांना एकत्र आणण्याचा वसा घेतला. पतीच्या निधनानंतर निराधार महिलांना संसाराचा गाडा चालविताना येणाऱ्या अडीअडचणींची जाण असल्याने साबाजी सावंत यांनी तालुक्यातील १२०० निराधारांना एकत्रित आणून त्यांची संघटना तयार केली.निराधार महिलांसाठी भाऊबीज उपक्रमनिराधार महिलांना एकत्रित आणून त्यांच्या जीवनात प्रकाशमय वाटा तयार करण्याचा वसा घेतलेल्या साबाजी सावंत यांनी निराधार महिलांसाठी दिवाळीमध्ये भाऊबीज कार्यक्रम राबविला. नि:स्वार्थी भावनेने समाजात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीने त्यांनी निराधार महिलांना साड्या भेट देऊन भाऊबीजेचा आगळावेगळा कार्यक्रम राबवून त्यांच्याही आयुष्यात सणासुदीचा आनंद मिळवून देण्याचे काम केले. तसेच दिव्यांगांसाठी प्रकाशाचे प्रतीक असलेले निरांजन भेट देऊन आगळीवेगळी दिवाळी दिव्यांग बांधवांसाठी साजरी केली.दिव्यांगांच्या बचतगटाची स्थापनादिव्यांग व निराधार महिलांना बचतीचे महत्त्व पटावे, त्यांनी कोणावर अवलंबून राहू नये, यासाठी साबाजी सावंत यांनी दिव्यांग बांधवांच्या बचतगटाची स्थापना केली. आतापर्यंत पाच बचतगट त्यांनी स्थापन केले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांची भेट घेऊन दिव्यांगांसाठी तातडीची गरज भासल्यास दहा हजार रूपये कर्जाऊ रक्कम देण्यात यावी, अशी विनंती केली आणि त्यास मान्यताही मिळाली.