चिपळूण : केंद्र शासनाने आधार क्रमांक सक्तीचा केल्यानंतर आधारकार्ड मिळवण्यासाठी राज्य शासनातर्फे खासगी कंपनीकडे जबाबदारी देण्यात आली. शासनाने आतापर्यंत राबवलेल्या आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम काही ठिकाणी अयशस्वी ठरल्याने आजही अनेक ग्रामस्थ आधारपासून वंचित आहेत. वृद्धांची आता आधारकार्डसाठी परवड होऊ लागली आहे. शासनाने आधारकार्ड पुन्हा सक्तीचे केले आहे. मात्र वृध्दांसाठी कोणतीच उपाययोजना न केल्याने आधारकार्ड काढताना वृध्दांचे हाल होत आहेत.आधारकार्डसाठी चिपळूण जुना एस. टी. स्टॅण्ड, गोवळकोट रोड व सावर्डे येथे तीन केंद्र उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी ग्रामीण भागातून आधारकार्ड नोंदणीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक येत असतात. मात्र, त्यांना येथे येऊनही नोंदणी केंद्र बंद असणे, गर्दी असणे किंवा चुकीची नोंदणी असणे, पावती न सापडणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वारंवार केंद्रावर फेऱ्या माराव्या लागतात. ग्रामीण भागातून येणारे वृद्ध व लहान मुले यांना तासनतास ताटकळत थांबावे लागते. गर्दी असली की, त्यांची परवड होते. नंबर आल्यावर योग्य उत्तर मिळाले नाही तर त्यांना परत जावे लागते. यामुळे वेळ व पैसा वाया जातो. राज्य शासनाने स्पॅनको कंपनीद्वारे आधारची यंत्रणा राबवण्याचे काम सुरु केले आहे. या कंपनीची केंद्र असल्याने त्यावर शासकीय यंत्रणेचा फारसा अंकुश नाही. चिपळुणातील काही आधारकेंद्रावर दोन दोन मशिन आहेत. परंतु, आॅपरेटर नसल्याने त्यांना एक मशिन बंद ठेवावे लागत आहे. चिपळूण येथील केंद्रावर गेले दोन दिवस सातत्याने गर्दी होती. काल केंद्र बंद होते. तसा फलक लावण्यात आला होता. आज बुधवारी पुन्हा सकाळी गर्दी झाली होती. परंतु, ० ते ६ वयोगटातील बालकांचे आधारकार्ड काढण्याची मोहीम शासनाने एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु केल्याने आज पुन्हा कर्मचारी तिकडे गेल्याने येथील केंद्र बंद होते. त्यामुळे पुन्हा येथे आलेल्या ग्रामस्थांची गैरसोय झाली. आधारकार्डबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. शासनाने या यंत्रणेत सुसुत्रता आणण्यासाठी प्रयत्न करावेत व ग्रामीण भागात आधारच्या नोंदणीसाठी केंद्र सुरु करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)खोपड येथील ८५ वर्षांच्या सुलोचना पालांडे या आजी आतापर्यंत तीनवेळा येऊन गेल्या. गॅस जोडणीसाठी त्यांना आधारकार्डची गरज आहे. त्या रिक्षा करुन आल्या होत्या. केंद्र बंद असल्याने त्यांना तिसऱ्यांदा आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. तारेवरची कसरत...गॅस व शिधापत्रिकेसाठी आधारकार्ड अनिवार्य असल्याने करावी लागतेय धडपड. आधार नोंदणी केंद्र चिपळूण तालुक्यात केवळ तीनच असल्याने होतेय गैरसोय. महा - ई सेवा केंद्रांकडे एकात्मिक बालविकास प्रकल्प व इतर शासकीय शिबिरांचा कार्यक्रम असल्याने मशिनचा तुटवडा.ग्रामीण भागातील जनतेच्या वेळ व पैशांचा अपव्यय होत असल्याने संताप.
आधारकार्डसाठी ससेहोलपट
By admin | Published: March 11, 2015 11:20 PM