प्रथमेश गुरववेंगुर्ला : तालुक्यातील वडखोल गावातील सचिन भालचंद्र पालव या युवकाने अंधत्वावर मात करीत जिद्द व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तबला, हार्मोनियम व गायन या तिन्ही विषयांमध्ये ‘विशारद’ ही पदवी मिळविली आहे. दृढ निश्चय आणि आत्मविश्वास असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करू शकतो, हे सचिन याने या कृतीतून दाखवून दिले आहे.सचिन हा जन्मत:च अंध आहे; पण त्याला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. ही त्यांची आवड लक्षात घेऊन त्याच्या आजोबांनी तसेच आई-वडिलांनी व काकांनी त्याला खंबीर साथ दिली. सचिनने नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या गायन विशारद पूर्ण या परीक्षेमध्ये अतुलनीय यश प्राप्त करून प्रथम श्रेणी मिळविली आहे.गुरुदास मुंडये यांच्याकडे २०१२ पासून सचिनने गायन शिक्षणाला प्रारंभ केला. तर २०१६ पासून ऋषिकेश देसाई यांच्याकडे पुढील शिक्षण घेतले. दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सचिनने ‘विशारद’पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. सन २०१३ मध्ये तबला विशारद प्रथम श्रेणी, सन २०२० मध्ये हार्मोनियम विशारद प्रथम श्रेणी तर सन २०२३ मध्ये गायन विशारदमध्ये प्रथम श्रेणी मिळवून अंधत्वावर मात करून तिन्ही विषयांमध्ये ‘विशारद’ होण्याचा मान पटकाविला. तिन्ही क्षेत्रांत विशारद पदवी मिळवित असताना सचिन याला तबल्यासाठी तुळशीदास गावडे व प्रमोद मुंडये, हार्मोनियम व गायनासाठी गुरुदास मुंडये व ऋषिकेश देसाई तर पखवाजसाठी नीलेश पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
आर्थिक परिस्थिती ढासळलीदरम्यान, सचिनला अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे त्याला किडनी ट्रान्सफर करावी लागल्याने आर्थिक परिस्थिती ढासळली. परिणामी, तो पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी जाऊ शकला नाही. तरी लवकरच पखवाज विशारद पूर्ण ही पदवी प्राप्त करण्याचा त्याचा निश्चय आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.