मळेवाड : आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे, तसेच आपत्तीतून बाहेर कसे पडावे याचा मार्ग दाखवणारे, सतत आपत्ती व्यवस्थापनचा पाठ शिकविणारे रवींद्र गुणाजी मुळीक यांचा खेड येथील अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू जिल्हावासियांना चटका लावून जाणारा ठरला आहे. अकस्मात येणाऱ्या आपत्तीतून सहीसलामत कसे बाहेर पडावे, आपल्याबरोबर इतरांचाही जीव कसा वाचवावा, हे शिकविणाऱ्याचा अपघातात दुर्दैवी अंत व्हावा, ही नियतीची कू्र र चेष्टाच असून त्याच्या मळेवाड-कोंडूरे गावी त्यांच्या अचानक जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मंगळवारपासून अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. रवींद्र मुळीक हे मूळचे कोंडुरे-मळेवाड येथील. मात्र, सध्या ते कळंबोली, नवी मुंबई येथे राहत होते. त्यांनी अनेक ठिकाणी आपत्तीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या स्वसंकल्पनेतून महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गची स्थापना केली गेली. या संस्थेची प्रमुख जबाबदारी सांभाळून संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारत आणि भारताच्या बाहेरही या संस्थेद्वारे त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. आपल्या मूळ गाव कोंडुरे येथील तरूणांना प्रशिक्षित करून त्याद्वारे पंचक्रोशी, दशक्रोशीतील गावागावांमध्ये, शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. देशाबरोबरच परदेशात बांगलादेश श्रीलंका, नेपाळ आदी देशांमध्ये जाऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा घेतल्या. तिथल्या लोकांना प्रशिक्षित केले. आणि आजही तेथील तरूण रवींद्र मुळीक यांचा आवर्जून उल्लेख करतात. जिल्ह्यात कोणतीही आपत्ती येऊ दे, त्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रात्यक्षिकच मुळीक यांच्याकडून शिकावे. अनेकवेळा प्रत्यक्ष प्रसंग घडले की, पहिली धाव मुळीक यायची असायची. ते स्वत: येत असत आणि आपल्याबरोबर प्रशिक्षित युवक घेऊन येत होते. मागील आठ वर्षे या संस्थेचे काम जोमात चालले होते. अनेक तरूण यात सहभागी होत आहेत. विशेष करून, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अधिक अपघात होतात. याठिकाणी आपली जास्त गरज आहे, असे त्यांना वाटे. अखेर याच मार्गावर अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हे ऐकून अनेकांना धक्काच बसला .ज्याच्या साठी मुळीक सतत लढत होते. त्याच मार्गावर त्यांचा प्राण जाईल हे त्यांनाच काय, कोणालाही वाटले नव्हते. ते नेहमी मुंबई-गोवा असा प्रवास करीत. पण मंगळवार हा त्यांच्या आयुष्यातील एक अखेरचा दिवस घेऊन आल्यासारखेच त्यांना काळ घेऊन गेला, त्यामुळे मात्र, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर) आपत्तीप्रसंगी धावून यायचे : पुतणीच्या विवाहासाठी येत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनचे धडे पहिल्यांदा रवींद्र मुळीक यांनी दिले. त्यांची इको कारही नेहमी आपद्ग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठीच होती. त्यांच्या गाडीत नेहमी आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य असायचे. अनेक वेळा आंबोली येथे आपत्तीची घटना घडायची, त्यावेळी रवींद्र मुळीक यांची आठवण व्हायची आणि ते हजर व्हायचे. रवींद्र मुळीक हे आपल्या कुटुंबासमवेत मंगळवारी मळेवाड-कोंडुरा येथे येत होते. त्यांचा १ जूनला म्हणजे बुधवारी वाढदिवस, तर पुतणीचे दोन दिवसांनी लग्न होते. या आनंदात कुटुंब असतानाच घडलेल्या या प्रकाराने सर्वांच्या दु:खाचा बांधच फुटला असून, अनेकांना धक्का बसला आहे.
कोंडुरे गावावर दु:खाचा डोंगर
By admin | Published: June 02, 2016 12:34 AM