सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबोली दूरक्षेत्र येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे यांनी गेळे नदीतून वाहत जाणाऱ्या दोन पर्यटकांचा जीव वाचविला होता. या उल्लेखनीय कामगिरीची दखल पोलीस महासंचालकांनी घेत त्यांना सन्मानचिन्ह जाहीर केले असून त्याचे वितरण १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर होणार आहे.आंबोली गाव हे सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण असून पावसाळ्यात आंबोली हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध असल्याने गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर भागातील पर्यटक याठिकाणी आनंद लुटण्यासाठी भेटी देत असतात. १५ जून २०१२ रोजी आंबोली येथे दिवसभरात सरासरी ७५० मिमी पाऊस पडला होता. त्यादिवशी अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्तीसारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे पोलीस हेडकॉन्स्टेबल सदानंद साळुंखे हे आंबोली परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक एस. एन. टाळेकर यांनी साळुंखे यांना गेळे नदीच्या पात्रातून दोन पर्यटक वाहून जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे लागलीच साळुंखे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत गेळे नदीच्या ठिकाणी पोचून वाहून जात असलेल्या शंकर पाटील व आनंदा देवगौडा (हुबळी) या दोन पर्यटकांचे आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने प्राण वाचविले. या उल्लेखनीय कामगिरीबाबत सदानंद साळुंखे यांना पोलीस महासंचालक मुंबई यांनी ९ एप्रिल २०१५ च्या आदेशान्वये पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान केले असून १ मे रोजी पोलीस मुख्यालयाच्या (ओरोस) संचलन मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या संचलनावेळी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
सदानंद साळुंखेंचा होणार सन्मान
By admin | Published: April 15, 2015 9:32 PM