कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना तळगाव ते कलमठ टप्प्यात अनेक ठिकाणी उड्डाणपूल व बॉक्सवेलची कामे सुरू आहेत. कर्मचारी जीव धोक्यात घालून लोखंडी शिडीच्या सहाय्याने तीस ते चाळीस फूट उंचावर चढून बॉक्सवेल भिंतीच्या काही भागांना तडे गेले असताना डागडुजीचे काम करीत असल्याने महामार्गकामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. यामुळे यावर ठेकेदार कंपनीसह महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.मुंबई-गोवा महामार्गावर अंतर्गत चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून डागडुजी करण्याचे काम आजही सुरू आहे. त्यात सतत पडणारा पाऊस ठेकेदार कंपनीला चिंतेत पाडणारा असून अति पावसामुळे अनेक ठिकाणी कामाचा पोलखोल झालेला दिसून आला आहे.यातच ठेकेदार कंपनी डागडुजी करून आपले काम करून घेत आहे. कणकवली शहराप्रमाणे इतर भागातही बॉक्सवेल व उड्डाणपुलाचे काम सुरू असताना काही भाग कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यात सत्ताधारी व विरोधी नेते मंडळी फक्त आश्वासन देऊन ठेकेदार कंपनी व महामार्ग प्राधिकरण यांना पुन्हा काम करायला भाग पाडू असे सांगतात. मात्र, डागडुजीशिवाय यापुढे काहीच झालेले दिसत नाही.प्रारंभी सध्या संरक्षक भिंतीना गेलेल्या तड्यांना सिमेंट व वाळू यांचे मिश्रण करून मुलामा देताना दिसून येत आहे. यामध्ये ठेकेदार कंपनीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून तीस ते चाळीस फूट उंचावर शिडीवर चढून हातात सिंमेटचे भरलेले घमेले घेऊन बॉक्सवेल भिंतीचे तडे बुजवित आहेत.सद्यस्थितीत याठिकाणी ठेकेदार कंपनी अशा कर्मचाऱ्यांना डोक्यावर व अंगावर घालण्यास कोणतेही संरक्षक कीट न देता उंचावरील काम करून घेतात. खाली फक्त एखादा कर्मचारी अथवा सुपरवायझर उपस्थित असतात. अशाप्रकारे काम केल्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. ठेकेदार कंपनी अशा बॉक्सवेलच्या कामाच्या दर्जाची हमी देत असल्याने वाहनचालक व नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठेकेदार मात्र, लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्याच्या मागे लागला आहे.कर्मचाऱ्यांना संरक्षक कीट देण्याची गरजसध्या नांदगाव, कासार्डे, तळेरे येथे अशाप्रकारे पुलाच्या भिंतीना मुलामा देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कणकवलीसारखी घटना सुदैवाने तळगाव ते कलमठ टप्प्यात घडली नसल्याने या पुलाच्या कामांचा दर्जा आजपर्यंत तरी चांगला आहे.मात्र, ठेकेदार कंपनी सध्या कर्मचाऱ्यांना संरक्षण न देता करीत असलेली कामे धोका निर्माण करणारी असल्याने सर्वच कामे सुरू असताना कर्मचाऱ्यांना संरक्षक किटची गरज आहे. तसेच यावर महामार्ग प्राधिकरण कंपनीने लक्ष घालून सूचना देण्याची गरज आहे. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर, महामार्ग ठेकेदार कंपनीचा गलथान कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:42 AM
मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असताना कर्मचारी जीव धोक्यात घालून लोखंडी शिडीच्या सहाय्याने तीस ते चाळीस फूट उंचावर चढून बॉक्सवेल भिंतीच्या काही भागांना तडे गेले असताना डागडुजीचे काम करीत असल्याने महामार्ग कामगारांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे.
ठळक मुद्देमहामार्ग ठेकेदार कंपनीचा गलथान कारभारअधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी