अरूण आडिवरेकर --रत्नागिरी --‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष दरवर्षी भक्तगण मोठ्या उत्कंठेने करतात. या जयघोषानंतर सर्वजण गणेशाची वाट पाहात असतात. यावर्षी भक्तांनी घातलेली ही हाक गणपती बाप्पाने ऐकली असून, पुढच्या वर्षी एक - दोन दिवस नव्हे; तर तब्बल ११ दिवस अगोदर गणरायाचे आगमन होणार आहे.कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवाची चाहुल लागली की, अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांनाच उत्सुकता असते. या उत्सवाला कामानिमित्त मुंबई, पुणे येथे गेलेली व्यक्ती रजा घेऊन आपल्या गावी गणेशोत्सवासाठी येते. कोणाच्या घरी दीड दिवस, कोणाच्या घरी पाच दिवस, काहीजण तर अकरा दिवस गणेशाची पूजा करून त्याची आराधना करतात. या उत्सव काळात गावोगावी आरती, भजने, जाखडी यांचे सूर ऐकायला मिळतात. संपूर्ण वातावरण मंगलमय आणि भक्तीमय झालेले असते.गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर त्याच्या विसर्जनाची वेळ आली की, साऱ्यांचे अंत:करण दाटून येते. आपल्या घरी आलेला गणराय जाऊच नये, अशी भावना साऱ्यांचीच असते. तरीही त्याच्या आगमनाप्रमाणे विसर्जनाची जय्यत तयारी केली जाते. विसर्जनावेळी आपला लाडका लवकरच घरी यावा, यासाठी सारेचजण ‘पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त विनवणी करतात. यावर्षी भक्तांची ही विनवणी गणरायाने ऐकली असून, पुढच्या वर्षी सन २०१७मध्ये ११ दिवस आधी म्हणजे २५ आॅगस्टला गणरायाचे आगमन होणार आहे. एवढेच नव्हे; तर गणपती बाप्पाचा मुक्कामही दोन दिवसांनी वाढणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणेशाची सेवा करण्याची आणखीन संधी मिळणार आहे.
बाप्पाने ऐकले भक्तांचे गाऱ्हाणे!
By admin | Published: September 16, 2016 10:33 PM