अयोध्याप्रसाद गावकर --देवगड तालुक्यामध्ये आंबा फवारणीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके ही बनावट विकली जात आहेत. याकडे कृषी विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याने तालुक्यातील बनावट कीटकनाशक औषधांचा सुळसुळाट वाढला आहे. बनावट औषधांमुळेच अतिरिक्त कीटकनाशक फवारण्या बागायतदारांना कराव्या लागत आहेत. अतिरिक्त फवारण्यांमुळे औषधांचा खर्चही बेसुमारपणे वाढला आहे. त्यामुळे बागायतदार सध्या मेटाकुटीस आले आहेत.देवगड तालुक्यामध्ये सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रावरती आंबा लागवड केली असल्याची नोंद कृषी विभागामध्ये आहे. या आंबा कलमांवरती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोहोर येण्यास सुरुवात झाली होती. आंबा कलमांना मोहोर हा तीन ते चार टप्प्यांमध्ये येत असतो. म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी महिन्यामध्ये आंबा मोहोर येतो. या मोहोराला सुरुवातीपासून कीटकनाशक औषधांची फवारणी करावी लागते. यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामधील २० टक्के आंबा कलमांना मोहोर आला होता. नोव्हेंबर महिन्यापासून आंबा कलमांवर येथील बागायतदारांनी फवारणी सुरू केली आहे. यावर्षी तालुक्यातील बहुतांश आंबा कलमांना सुमारे ८० टक्के मोहोर आतापर्यंत आला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोराला फळधारणा समाधानकारक होत असल्याचे दिसून येत होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यातील मोहोराला फळधारणाच झाली नसल्याने कीटकनाशके फवारणी औषधांचा खर्च पूर्णत: वाया गेला आहे.तिसऱ्या टप्प्यातील आंबा कलमांना बऱ्याच प्रमाणात मोहोर आला आहे. या मोहोरावरती समाधानकारक फळधारणा होईल अशी आशा आंबा बागायतदारांनी उराशी बाळगली आहे. ही फळधारणा दिसण्यासाठी आणखी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. यानंतरच या मोहोरावरती फळधारणेचे चित्र स्पष्ट होणार आहे. थ्रीप्स या रोगावरती बरीचशी कीटकनाशक औषधे तालुक्यामध्ये राजरोजपणे विक्री केली जात आहेत. थ्रीप्स रोगावरील बनावट औषधांची एजंट जाहीररीत्या पोस्टर लावून जाहिरातबाजी करत आहेत. असे असतानाही कृषी विभाग मात्र त्याकडे कानाडोळा करत आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षपणामुळेच तालुक्यातील बनावट औषधे विकणाऱ्या विके्रत्यांचा दिवसेंदिवस सुळसुळाट वाढला आहे. काही बनावट औषधांमुळे अन्य कीटकही फैलावले जात आहेत. थ्रीप्स या रोगावरील अनेक महागडी औषधे आहेत. यातील बरीच औषधेही बनावट असल्याचे दिसून येत आहे. कृषी विभाग कुठलेही ठोस पाऊल उचलत नसल्यानेच बनावट औषधे विक्रेत्यांना मुभा मिळाली आहे. वारंवार फवारणी, मात्र उपयोग नाहीवारंवार कीटकनाशकांची फवारणी करून त्याचा परिणाम कोणत्याही कीटकांवरती होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे ही कीटकनाशक औषधे बनावट असल्याचे सरळसरळ दिसून येत आहे. महागडी कीटकनाशके औषधे वापरूनही कीटक दूर होणे बाजूलाच राहते, कीटकांचा प्रादुर्भाव मात्र वाढतच राहतो. यामुळे १५ दिवसांनी करावी लागणारी आंबा मोहोरावरची फवारणी ८ दिवसांनीच बागायतदारांना करावी लागत आहे. आठ-आठ दिवसांनी फवारणी करूनही कीटकांचा प्रादुर्भाव दूर होत नाही. विक्रेत्यांना रान मोकळेदेवगड तालुक्यात बनावट औषधे विकणारी टोळीही कार्यरत असल्याचे सांगण्यात येत आहे. कृषी विभागाचे अधिकारी हे विक्रेत्यांकडून हप्ते गोळा करून, त्या विक्रेत्यांना बनावट औषधे विकण्यासाठी रान मोकळे करून देत आहेत. गुणनियंत्रक कृषी विभागाचे अधिकारीही विक्रेत्यांकडून हप्ते गोळा करत असल्याचीही चर्चा केली जात आहे. यामुळे एकाएकी पडलेल्या आंबा बागायतदारांना कोणीही वाली नसल्यामुळे बनावट औषधे खरेदी करावी लागत आहे. बनावट औषधांमुळेच तालुक्यातील आंबा उत्पादनात गेल्या चार-पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात व चिंंताजनक अशी घट होत आहे. ही बाब शेतकऱ्यांसमोर गंभीर स्वरूपाची असून, बनावट औषधांना कृषी विभागाने आळा न घातल्यास जगप्रसिद्ध देवगड हापूसचे उत्पन्न संपुष्टात येऊ शकते. परजिल्ह्यातील कीटकनाशक एजंट हे तालुक्यात येऊन बनावट औषधे शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विकत असल्याचे दिसून येत होते. तर आता स्थानिक औषध विक्रेतेही बनावट औषधे विकत असल्याचे दिसून येत आहे. - मंगेश पुजारेआंबा बागायतदार, पुरळ
बनावट कीटकनाशकांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2016 11:45 PM